मुंबई पुणे एक्स्प्रेसवर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जण ठार झाले आहेत. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. इरटीका कारने एका वाहनाला मागून धडक दिल्याने हा भयानक अपघात झाला असल्याचं समोर येत आहे. या गाडीत एकूण 7 लोक होते. यातील 5 जणांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर चौघांचा जागीच तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात 2 जण गंभीर जखमीही झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत एक महिला वाचली असल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी असलेल्या दोघांनाही उपचारासाठी कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या घटनेतील सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना रात्री बारा वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की धडक होताच गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. यात गाडीचा दरवाजा तुटला आणि आतील प्रवाशी बाहेर पडले. या घटनेत अतिरक्तस्त्राव झाल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर याचवेळी महामार्गावरून जात असलेल्या एका वाहन चालकाने महामार्ग पोलिसांना या घटनेबद्दलची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच महामार्गावरील आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केलं. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, रस्त्यातच आणखी एकाचा मृत्यू झाला. सध्या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.