राज्य सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा निर्णय यंदाच्या ऊस गळीत हंगामात घेतला. याचबरोबर साखर कारखानदारांनी मागील हंगामातील वाढीव 200 रुपये अद्यापही दिले नसल्याने शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी 17 आणि 18 नोव्हेंबरला ऊस तोडी बंद ठेवून यावर निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती. परंतु राज्य सरकारने आणि कारखानदारांनी याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने कालपासून (दि.17) माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन पुकारले आहे. आज दुपारपर्यंत कोणताही निर्णय घेतला नाहीतर आंदोलनाचा भडका उडणार असल्याचे शेट्टी म्हणाले.
आज दुपारपर्यंत या आंदोलनाबाबत सरकारची काय प्रतिक्रिया येते, ते पाहून दुपारी दोन वाजता कोल्हापूर येथे महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. सरकारकडून प्रतिक्रिया न आल्यास आजच्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. आंदोलनाला साथ द्या, केंद्र सरकारला वठणीवर आणल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. याचबरोबर महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी व ऊस वाहतूकदार यांनी शंभर टक्के ऊसतोड बंद ठेवून सहकार्य केल्याबद्दल शेट्टी यांनी आभार मानले.
राजू शेट्टी म्हणाले, गेली 25 वर्षे ऊस उत्पादन शेतकर्यांचे नेतृत्व आणि चळवळी करतो; पण इतका असंवेदनशीलपणा कोणत्याही मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाने दाखवला नाही. आमचे शांततेच्या मार्गाने, सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. शेतकर्यांनी हिंसक आंदोलन केल्यानंतर मगच सरकार लक्ष देणार आहे का? असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला. गेली दोन वर्षे साखरेच्या विक्रीची किंमत केंद्र सरकारने स्थिर ठेवली आहे.
सर्व प्रकारच्या शेतीच्या उत्पादन खर्च वाढला, मग साखरेच्या विक्रीचा दर केंद्र सरकारने का नाही वाढवला? केंद्र सरकारने आपल्या सरकारी नोकरांचा महागाई भत्ता वाढवून दिला. याचा अर्थ महागाई निर्देशांक वाढत आहे हे माहीत असताना सुद्धा साखरेची किंमत सरकार का नाही वाढवत, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला.