२२ ऑक्टोबर पासून राज्यभरातील
चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार
राज्यातील महाविकासआघाडी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. शाळा, धार्मिकस्थळांपाठोपाठ आता, राज्यभरतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास देखील परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार २२ ऑक्टोबर पासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. करोना नियमांचे पालन करून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली गेली आहे.
केंद्र सरकारने ओबीसी समाजाचं,
मुलांचं नुकसान केले : छगन भुजबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज जळगावमध्ये ओबीसी परिषदेला प्रमुख उपस्थिती लावली. भाषण करताना छगन भुजबळ यांनी जोरदार टोलेबाजी केली. तसेच, भाजपावर खोचक टीका करतानाच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने समाजाचं, मुलांचं नुकसान केल्याची टीका देखील छगन भुजबळ यांनी यावेळी केली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलण्याची ताकद संसदेकडे असताना ५० टक्क्यांच्या मुद्द्यावर का निर्णय घेतला जात नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
देशांमध्ये करोनाबाधितची
संख्या झाली कमी
देशभरात ६० टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार देशात २९ हजार ६१६ नवे करोनाबाधित आढळले आहेत. शुक्रवारी हाच आकडा ३१ हजार ३८२ इतका होता. त्यामुळे नव्या करोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट गेल्या २४ तासांमध्ये दिसून आली आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि सरकारसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.
आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली
भाजपकडून सीआयडी चौकशीची मागणी
राज्याच्या आरोग्य विभागाच्या गट क आणि ड साठीच्या ६ हजार २०५ जागा भरण्यासाठी होणारी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे राज्यभरातल्या परिक्षार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सदर प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत परिक्षेची नवी तारीख जाहीर करु, असं आश्वासनही दिलं आहे. भाजपाने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तालिबानच्या प्रवक्त्यांनी केली
पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका
तालिबानच्या प्रवक्त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीकेचा भडीमार केलाय. इम्रान खान हे एखाद्या कळसुत्री बाहुल्याप्रमाणे असून त्यांना पाकिस्तानच्या लोकांनी निवडून दिलेलं नाही असा टोला तालिबानने लागवला आहे. फ्रायडे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तालिबानने पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये अती रस न घेण्याचा खोचक सल्ला दिला आहे.
जेएनयूचा नेता कन्हैया कुमार
२८ ला काँग्रेसमध्ये जाणार
जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार २८ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षात सामील होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कन्हैया कुमारने राहुल गांधी यांची भेट घेतली होती आणि त्यामुळे त्याने पक्षात प्रवेश केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र आता ह्या अफवांना पूर्णविराम लागला आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) चा सदस्य असलेला कन्हैया कुमार हा त्याच्या भडक भाषणांसाठी, विशेषत: जेएनयूच्या दिवसातील भाषणांसाठी ओळखला जातो.
दीड लिटर कोकाकोला
प्यायल्याने तरुणाचा मृत्यू
चीनमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मरण पावलेल्या व्यक्तीने १० मिनिटांमध्ये दीड लीटर कोका कोला संपवला. त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर कोबीजिंग के चाओयांग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मोठ्याप्रमाणे शितपेय प्यायल्यानंतर अवघ्या १८ तासांमध्ये या तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली आणि त्याचा रक्तदाब कमी झाला. त्यानंतर तो जोरजोरात श्वास गेऊ लागला. पोटामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस साठून राहिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय.
औरंगाबाद मध्ये डेंग्यूचा
आढळला नवा व्हेरिएंट
सततच्या बदलणाऱ्या कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटमुळे जगभरातील आरोग्य तज्ज्ञांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. यातच आता डेंग्यूच्या विषाणूतही बदल दिसून येत असल्याचा इशारा देण्यात आल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा खडबडून जागी झाली आहे. रुग्णाच्या शरीरात डेंग्यूची लक्षणे आढळून येत असली तरीही डेंग्यूची चाचणी मात्र निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञही गोंधळून गेले आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत
भारताला स्थायी सदस्यत्व मिळणार
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या पहिल्या द्विपक्षीय बैठकीचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये जो बायडन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी कोविड -19 आणि हवामान बदल, व्यापार आणि इंडो-पॅसिफिकसह अनेक प्राधान्य मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीबद्दल माहिती देताना भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची घेतली.
ऑक्टोबर महिन्यात बँकांना
एकवीस दिवस सुट्ट्या
भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) च्या ऑक्टोबर महिन्याच्या अधिकृत बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार आगामी कॅलेंडर महिना सुट्ट्या आणि सणांनी भरलेला आहे. ज्यामुळे भारतातील अनेक शहरांमधील अनेक बँका बंद राहणार आहेत. बँका ऑक्टोबर महिन्यात सुमारे 21 दिवस बंद राहण्याची अपेक्षा आहे. आरबीआयने ऑक्टोबर महिन्यासाठी 14 बँक सुट्ट्या जारी केल्यात, शनिवार आणि रविवार तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह एकूण सात दिवसांच्या सुट्टीचा समावेश आहे.
आचार्य रजनीश यांच्या पुण्यातील
आश्रमात जमीन घोटाळा
आचार्य रजनीश उर्फ ओशो यांच्या आश्रमात भूखंड घोटाळा झाला आहे. पुण्यातील ओशो आश्रामांच्या संचालकांनी आश्रमाच्या 20 एकर जमिनीपैकी 8 एकर जमीन विकली असून आश्रमात अनेक गैरकारभार होत आहेत. त्याची केंद्र सरकारने चौकशी करावी, अशी मागणी ओशोंच्या अनुयायांनी केली आहे. ओशोंच्या अनुयायांनी तसे साकडेच आठवले यांना घातले आहे.
SD social media
9850 60 3590