पंकजा मुंडेंच्या मनात काय? नवीन वर्षाच्या नव्या संकल्पाने चर्चांना उधाण!

नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नवा संकल्प केला आहे. पंकजा मुंडेंचा हा संकल्प म्हणजे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय व्हायचे संकेत तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंकजा मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या नव्या संकल्पाबाबत माहिती दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या युट्युब चॅनलवरून नागरिकांशी हिंदी मधून संवाद साधला. आपण हिंदीमधून देशभरातील नागरिकांशी संवाद साधणार असल्याचं म्हणलं. पंकजा यांनी हिंदीमधून साधलेला संवाद म्हणजे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय व्हायचे संकेत नाहीत ना? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. देशभरातले माझे फॉलोअर्स मला भेटतात तेव्हा तुमची भाषा आम्हाला समजत नाही, तुम्ही मराठी माणसांसाठी वेगळं आणि आमच्यासाठी वेगळं बोला, असं सांगतात, असं पंकजा मुंडे त्यांच्या या व्हिडिओमध्ये म्हणाल्या.

पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा मागच्या काही वर्षांपासून वारंवार सुरू आहेत. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. कदाचित माझी तेवढी पात्रता नसेल, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी त्यांची नाराजी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली.

2014 साली राज्यात भाजपचं सरकार आल्यानंतर पंकजा मुंडे यांना महत्त्वाची खाती देण्यात आली. याच काळात त्यांनी आपण जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहोत असं वक्तव्य केलं होतं, त्यामुळेही वाद झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा त्यांचेच चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. तेव्हापासून पंकजा नाराज असल्याच्या चर्चांनी आणखी जोर धरला.

पंकजा राष्ट्रीय राजकारणात?

पंकजा मुंडेंच्या या ‘नया संकल्प’ मुळे त्या राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पंकजा राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाल्या तर त्यांना 2024 लोकसभेचं तिकीट मिळणार का? पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघातून त्यांचीच बहीण प्रीतम मुंडे या खासदार आहेत, त्यामुळे पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट मिळालं तर प्रीतम मुंडेंना कोणती जबाबदारी मिळणार? असे प्रश्न पंकजा मुंडे यांच्या नव्या संकल्पाने उपस्थित होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.