देशाची वाटचाल अध्यक्षीय हुकूमशाहीकडे होत आहे. सत्ताधारी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करत आहेत, मात्र सर्व भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे आता या पक्षाचे नामांतर ‘भ्रष्ट जनता पार्टी’ असे करण्याची वेळ आली आहे, असे टीकास्त्र शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सोडले.लोकशाहीवर घाला घालताना न्यायालयांवरही नियंत्रण ठेवण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे. मात्र असे होऊ नये म्हणूनच घटना रक्षणासाठी महाविकास आघाडी ‘वज्रमूठ’ बांधत असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
हिंदूत्व सोडल्याची टीका करतात, परंतु हिंदूत्वाचे मोजमाप करण्याची तुमची पात्रता नाही. काश्मीरमध्ये भाजपने मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर युती केली होती, तेव्हा ते कोणते हिंदूत्व होते? मेघालयात संगमा काही दिवसांपूर्वी भ्रष्ट होते. नितीशकुमार यांचे सरकार पाडले तेव्हा तुम्ही काय करत होतात, असे प्रश्न करत ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.निवडणुका जवळ आल्या, की जातीय तेढ निर्माण करायची. जेथे हिंदूना आक्रोश करावा लागतो तो नेता काय कामाचा? मी हिंदूत्त्व सोडले त्याचे एक उदाहरण दाखवा, मी घरी बसेन. आम्ही घटनेची पूजा करत आहोत आणि तिचे रक्षण करणार आहोत, असेही ठाकरे म्हणाले.
सभेस विरोधी पक्षनेते अजित पवार ,अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, अनिल परब , सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, दिवाकर रावते, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, विक्रम काळे, काँग्रेसचे प्रभारी आशिष दुआ, अमर राजूरकर, डी.पी. सावंत, कैलास गोरंटय़ाल, सतीश चव्हाण, कल्याण काळे आदींची उपस्थिती होती.
जो विरोधात बोलतो त्याच्या घरी ‘ईडी’ पोहोचते. आपल्या विरोधात कोणी बोलता कामा नये, असे वातावरण निर्माण केले जात आहे. लोकशाहीवर आघात करणाऱ्यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी ‘जोडो भारत’ यात्रा काढली. अदानी प्रकरणावर त्यांना सभागृहात बोलू दिले नाही. अन्यायकारकरित्या त्यांची खासदारकी काढून घेतली, अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. ही वज्रमूठ अशीच ठेवली तर १८० पेक्षा जास्त जागा मिळवू, असेही ते म्हणाले.
‘वज्रमूठ’ हे एकी दाखविणारे चित्र व्यासपीठावर उजव्या बाजूला, दुसऱ्या बाजूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण चित्र. मध्यभागी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र, फलकाच्या एका बाजूला अजित पवार आणि नाना पटोले यांची छायाचित्रे, दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी आणि शरद पवार यांची छायाचित्रे. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या बाजूला महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकारांची छायाचित्रे लावण्यात आली होती. शहरातील प्रमुख चौकांत भगव्या ध्वजाबरोबर घडय़ाळ चिन्हाचेही घ्वज लावण्यात आले होते.