काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाचा राज्यातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला. अशावेळी सरकार आणि विमा कंपन्यांकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. मात्र, तिकडूनही योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या तिजोरिवर पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून दरोडा टाकला जात असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय. विमा कंपन्यावर नियंत्रण करणाऱ्या आयआरओ संस्थेकडे तक्रारी देखील केल्या. पण काही होत नाही. विमा कंपन्या कसे घोटाळे करतात त्याचे पुरावेही दिले. त्याचीही दखल घेतली नाही. केंद्राच्या आणि राज्याच्या तिजोरिवर दारोडा टाकण्याचा हा प्रकार असून यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी, लोकनेते यांचा सहभाग असल्याची सडेतोड टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लातुरात केली आहे. यासोबतच सगळेच पक्ष नालायक असून त्यांच्यावर शेतकऱ्यांचा आणि जनतेचा विश्वास नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं देखील राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केलं. राजू शेट्टी हे लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी आले होते.
महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो : राजू शेट्टी
आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहेत. भाजपमधून या अगोदरच बाजूला झालो आहोत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई आमची संपलेली नाही. केंद्र व राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही, असे ठणकावून सांगणे गरजेचे आहे. मी मांडलेला हमीभावाचा कायदा अजून तो प्रलंबित आहे. केंद्र जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. शेतकर्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यावर कोणत्याच सभागृहात चर्चा केली जात नाही. त्यासाठी शेतकरी प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे गरजेचे आहे. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, अजित, संदीप राजोबा, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.