कॅनडामधून बेकायदा अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार भारतीयांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवरील नदीकाठच्या दलदलीमध्ये गेल्या आठवडय़ात आठ मृतदेह आढळले होते. त्याचा तपास सुरू असताना कॅनडा पोलिसांना याविषयी माहिती मिळाली. त्यांपैकी दोन मृतदेह तीन वर्षांपेक्षा लहान बालकांचे आहेत.
मृत भारतीय व्यक्तींमध्ये दोन पुरुष आणि एक स्त्री आहे. यापैकी एका पुरुषाचे वय साधारण ५० वर्षे आहे. अन्य एका पुरुषाचे आणि स्त्रीचे वय साधारण २० वर्षे आहे. चौथ्या व्यक्तीबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. चार मृत भारतीयांपैकी तिघेजण एकाच गुजराती कुटुंबातील आहेत, अशी माहिती भारतीय पोलिसांच्या हवाल्याने कॅनडातील माध्यमांनी दिली. या सर्वाचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला याचा तपास सुरू आहे.