दुचाकी विक्रीला ग्रहण लागले आहे. दुचाकी व्यवसायात रिव्हर्स गिअर पडला आहे. देशातील पहिल्या पाच दुचाकी वाहनांची फेब्रुवारीत एकूण विक्री 10 लाख 74 हजार 303 वाहनांची झाली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत हे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या सहा महिन्यांचा डेटा गोळा केला तर देशात जवळपास 7 लाख कमी दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. दुचाकी विक्रीत कमालीची घसरण वाहन उद्योगासाठी घातक ठरत आहे. कोरोनाकाळात (Corona) कसेबसे तग धरणाऱ्या ऑटो सेक्टरला सेमीकंडक्टर आणि चिप तुटवड्याचा फटका सहन करावा लागला.
आता विक्रीत घट झाल्याने वाहन उद्योगाचा ताप वाढला आहे. देशात बेरोजगारीचा दर 8.35% उच्चांकी पातळीवर आहे. त्याचा परिणाम विक्रीवर होत आहे. ग्राहक वाढत्या वाहन किंमतीमुळे नवीन दुचाकी खरेदीसाठी पुढे येत नसून जुन्या वाहनांच्या खरेदीकडे अनेकांचा कल वाढला आहे.
एकेकाळी शान समजल्या जाणाऱ्या मोपेडकडे तर कोणी ढुंकूनही पाहत नाहीये. गेल्या वर्षी जानेवारीत एकूण 59,007 मोपेडची विक्री झाली होती. यंदा जानेवारीत हा आकडा केवळ 35 हजार 785 इतका होता. म्हणजेच एका वर्षात 23,222 मोपेडची कमी विक्री झाली आहे. विशेष म्हणजे मोपेड अथवा स्वस्त दुचाकी वाहनांमध्ये पुरवठ्याच्या कमतरतेचा कोणताही मुद्दा नाही.
येथे विक्रेत्यांकडे सरासरी 25 ते 27 दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे, परंतु ग्राहक राजा दुकान आणि शोरुम कडे काही केल्या फिरकत नसल्याने चिंता वाढली आहे. सेमीकंडक्टर्सचा पुरवठा खंडित होत असल्याने प्रीमियम बाइकचे उत्पादन व्यवस्थित होत नसल्याचेही टीव्हीसी मोटर्सने आपल्या निवेदनात म्हटले होते. म्हणजे स्वस्त बाइक्स बनताहेत, पण विकत नाहीत.
CMIE जाहीर केलेल्या ताज्या बेरोजगारीच्या आकडेवारी या चिंतेत भर घालणारी आहे. गेल्या आठ महिन्यांत बेरोजगारी तिच्या उच्चतम पातळीवर पोहोचली आहे. आठ महिन्यांत बेरोजगारीचा दर 8.35% या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. जानेवारीत झालेल्या अवकाळी पावसाने पीक चक्र लांबले आहे. बटाटा, तांदूळ यासारख्या पिकांसाठीचे पैसेही शेतकऱ्यांना वेळेत मिळू शकले नाहीत. मनरेगाचा पैसा न मिळाल्याने बिगरशेती उत्पन्नही मोडीत निघाले आहे. म्हणजे ग्रामीण उत्पन्नाचे दोन्ही मुख्य स्रोत आटत चालले आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही. याचा थेट परिणाम वाहन विक्रीवर होत आहे.