उत्तर महाराष्ट्रात नऊ नोव्हेंबर पासून थंडी वाढण्याची शक्यता

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता, हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केली. मात्र, तूर्तास तरी नाशिकच्या हवेमध्ये प्रदूषण वाढले आहे.

उत्तर महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी थंडी वाढली होती. 30 ऑक्टोबर रोजी नाशिकचे तापमान 12.8 पर्यंत खाली आले, तर जळगावमध्ये राज्यात सर्वात नीचांकी 12 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली. त्यापूर्वी 23 ऑक्टोबर रोजीही नाशिकमध्ये राज्यात नीचांकी अशा 14.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ऐन दिवाळीत थंडी वाढणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता अचानक हवामान बदल झाला. आता 9 नोव्हेंबरनंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दक्षिण महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारतात सध्या ऐन दिवाळीत पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी केली. बंगालचा उपसागर आणि तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ते पश्चिमकडे सरकल्याने पावसाचा अंदाज आहे. या काळात कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगलीतही तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सध्या नाशिकमध्ये हवेने प्रदूषणाची खूप उच्च पातळी गाठली आहे आणि संवेदनशील लोकांसाठी ती रोगट आहे. जर आपल्याला श्वास घेण्यात अडचण येत असेल किंवा घसा खवखवत असेल तर तो प्रदूषणाचा परिणाम असू शकतो. सध्या नाशिकमध्ये AQI 71 वर गेला आहे. दरम्यान, नाशिककरांना यंदा सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाने झोडपून काढले. एकाच महिन्यात मनमाड, नांदगावसारख्या ठिकाणी दोनदा अतिवृष्टी झाली. शिवाय जिल्ह्यातील सर्व धरणे तुडूंब भरली. गोदावरी नदीला यंदा महिनाभरात चार पूर आले. हे पाहता आता येत्या काळात थंडीही जोरदार पडणार असल्याचा अंदाज आहे. पावसाप्रमाणेच थंडीचा सुद्धा कहर होऊ शकतो. हे सारे हवामान बदलाचे परिणाम आहेत. त्यामुळे सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन पर्यावरण प्रेमी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.