आर्यन खान प्रकरणातील वादानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची या प्रकरणातून उचलबांगडी करण्यात आलीय. एनसीबीचे अधिकारी संजय सिंग आता या प्रकरणाचा तपास करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी भूमिका स्पष्ट केलीय. आरोप झाले मग त्या अधिकाऱ्याला बदलायचं हा वाईट मेसेज जाणार असल्याचं प्रवीण दरेकरांनी अधोरेखित केलंय.
चूक आहे म्हणून बदली झाली, असं कारण मानायचं अजिबात गरज नाही. हा प्रशासकीय तपास यंत्रणेचा भाग आहे. जे आरोप होतायत, त्यासाठीच बदली झालीय किंवा त्यांची काही चूक आहे म्हणून बदली झाली, असं कारण मानायचं अजिबात गरज नाही. मोठ्या प्रमाणावर बिनबुडाचे आरोप झाले. जर तपास यंत्रणेला वाटत असेल की आरोप आहेत तर दुसऱ्या अधिकाऱ्याकडे ती चौकशी द्यावी, तर मला वाटत नाही की दबावानं बदली झालीय, असंही प्रवीण दरेकरांनी अधोरेखित केलंय.
तसेच आता तपासच होणार नाही, असे मानण्याचे कारण नाही. ही यंत्रणा आणखी ताकदीनं तपास करेल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल. मोठ्या प्रमाणात आरोप झाल्यानंतर तपास अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असता कामा नये. कदाचित अशातून निर्णय घेतला असेल. तपास यंत्रणेनं त्या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्याला नेमलं असेल तर मला त्यात काहीच गैर वाटत नाही. पण आरोप झाले मग त्या अधिकाऱ्याला बदलायचं, असा वाईट मेसेज जाऊ शकतो, असंही प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केलंय.
एनसीबीसारखी यंत्रणा फार मोठी तपास यंत्रणा आहे. ती निष्पक्षपणे चौकशी करेल, असं मला वाटतंय. समीर वानखेडेंना बदललं म्हणजे त्यांनी केलेला तपास चुकीचा मानायचं कारण नाही. तसेच संजय सिंग हेसुद्धा एनसीबीचे अधिकारी आहे. त्यामुळे तपास यंत्रणा कोणालाही पाठीशी घालणार नाही, यावर माझा विश्वास असल्याचंही प्रवीण दरेकर म्हणालेत.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप होत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रुझवरील छापेमारी हा प्लान होता असा आरोप करण्यापासून ते वानखेडेंच्या राहणीमानापर्यंत विविध आरोप केले होते. वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वानखेडे वादात सापडले होते. त्यानंतर क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही धक्कादायक कबुली दिली होती. तर काही पंचाना अटकही करण्यात आली होती. मुंबई एनसीबीकडून शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी केल्याचंही समोर आलं होतं.