नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्ण संधी. राज्यशासनाच्या अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास आणि रोजगार व उद्योजकता यांच्यामार्फत 12 ते 17 डिसेंबर 2021 दरम्यान महास्वयंम वेबपोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात जवळपास 25 हजार नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्यासाठी हा रोजगार मेळावा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्यामध्ये इयत्ता 9 वी पास पासून पुढे किंवा 10 वी, 12 वी, आय.टी.आय, डिप्लोमा तसेच बी.ई. व बी.टेक. आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांना सहभाग घेता येणार आहे.
नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी असून, संपूर्ण राज्यातील नामांकित उद्योग व व्यवसाय या मेळाव्यामध्ये सहभागी होत आहेत. एलजी इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, हायर ॲपलायन्सेस, महिंद्रा सीआय ई ऑटोमोटीव्ह लिमिटेड, आरएसबी ट्रान्समिशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा, नाशिक प्लांट, ग्रॅव्हिटी कन्स्ल्टंट प्रायवेट लिमिटेड इत्यादी नामांकित कंपन्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यामधील कंपन्या या मेळाव्यात आपला सहभाग नोंदविणार आहेत.
किमान 25 हजार रिक्तपदे उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उपलब्ध पदांबाबत उमेदवारांना महास्वयंम वेबपोर्टलवरून पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फायर-6 (2021) या पर्यायावर सविस्तर तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पदांसाठी देण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांनी काळजीपुर्वक अर्ज सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक व ऑनलाईन पंसतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा संकेतस्थळाच्या माध्यमाव्दारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.
ज्या उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवा योजना नोंदणी केली नसेल, अशा उमेदवारांनी महास्वयंम वेबपोर्टलवरून www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून आपल्या पात्रतेप्रमाणे उपलब्ध जागांसाठी अर्ज सादर करावे, अशा सूचनाही सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी दिल्या आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी 0253-2972121 या दूरध्वनी क्रमांक आणि nashikrojgar@gmail.com या ई-मेल आयडीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.