टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला 66 धावांनी मात देत पहिला-वहिला विजय मिळवला. पण त्याहून तगडा विजय आज भारताने स्कॉटंलडला (India vs Scotland) 8 गडी राखून पराभूत करत मिळवला आहे. विशेष म्हणजे भारताने स्कॉटलंडला दिलेलं लक्ष्य केवळ 39 चेंडूत पूर्ण केल्याने गुणतालिकेतही भारत नेटरनेटमध्ये सर्वांच्या पुढे गेला आहे. पण केवळ 2 विजय खात्यात असल्याने तिसऱ्या स्थानावर सध्यातरी भारत आहे.
पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 आणि नंतर न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिल्यानंतर भारतासाठी नंतरचे सर्व सामने करो या मरो असेच होते. त्यानुसार तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला मात दिली. पण तरीही नेटरनरेटमध्ये पुढे जाण्यासाठी भारताला मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. जी अपेक्षा आज उत्तम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीने भारताने पूर्ण केली आहे. आधी भेदक गोलंदाजीने भारताने स्कॉटलंडला 85 धावांमध्ये रोखलं. त्यानंतर सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी उत्तम सुरुवात केली. रोहित, राहुल बाद होताच अवघ्या 4 धावांची गरज सूर्यकुमारने षटकार ठोकत पूर्ण करत अवघ्या 6.3 षटकात संघाला विजय मिळवून दिला.
विश्वचषकाच्या एकाही सामन्यात भारताला नाणेफेक जिंकण्यात यश आलं नव्हतं. पण आज विराटच्या वाढदिवसादिवशी त्याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. ज्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी हा निर्णय़ अगदी बरोबर असल्याचं दाखवत वेगवान आणि फिरकी गोलंदाजीने स्कॉटलंडच्या फलंदाजांना चक्रावून सोडलं. भारताकडून जाडेजाने आणि शमी यांनी प्रत्येकी 3, तर बुमराहने 2 आणि आश्विनने एक विकेट घेतली. तर शमीच्याच ओव्हरला इशानने एका गड्याला रनआउट देखील केलं. ज्यामुळे स्कॉटलंडचा संघ केवळ 85 धावाच करु शकला. त्यांच्याकडून सर्वाधिक धावा सलामीवीर मुन्सीने 24 आणि लीस्कने 21 इतक्याच केल्या.
अवघ्या 86 धावांचं आव्हान भारतासमोर होतं. जे पूर्ण करण्यासाठी भारताने केवळ 39 चेंडूच घेतलं. यात सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी 80 धावा केल्या. दोघांच्या बॅट अक्षरश: आग ओकत होत्या. रोहितने 16 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकार ठोकत 30 धावा केल्या. तर राहुलने विश्वचषकातील वेगवान अर्धशतक ठोकत 19 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकार ठोकत 50 धावा केल्या. राहुल बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी 4 धावांची गरज होती. त्यावेळी फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमारने षटकार खेचत संघाचा विजय पक्का केला.