वडिलोपार्जित संपत्ती वरुन कुटुंबात होणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. वडिलांनी स्वतःच्या मिळकतीतून जी संपत्ती कमावलेली असते, त्यातील काही मालमत्ता जर मुलाला गिफ्ट म्हणून देण्यात आली असेल तर अशा मालमत्तेला वडिलोपार्जित मालमत्ता म्हणता येणार नाही. त्यामुळे मुलाला वडिलांनी गिफ्ट केलेल्या मालमत्तेवर मुलीला हक्क सांगता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
याचवेळी या प्रकरणातील मुलाला न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय संबंधित मालमत्ता न विकण्याचा आदेशही दिला आहे.
डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर एक भाऊ व दोन बहिणी अशा तिघा भावंडांत मालमत्तेच्या हक्कावरून वाद सुरू झाला. हे प्रकरण नुकतेच उच्च न्यायालयापुढे सुनावणीला आले होते. त्यावेळी न्यायालयाने बहिणींची मागणी अंशतः मान्य केली आणि मुलाला वडिलांनी गिफ्ट दिलेली मालमत्ता ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या परवानगीशिवाय संबंधित मालमत्ता विकू नये किंवा त्यावर तृतीय पक्षाचा हक्क बनवू नये, असे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले. वडिलांनी संबंधित फ्लॅट कुटुंबाच्या पैशांतून आणि कर्ज घेऊन खरेदी केला होता.
भावाने वडिल जीवंत असताना त्यांना अंधारात ठेवून तो फ्लॅट हडपला, असा दावा करीत गेल्यावर्षी दोन बहिणींनी 71 वर्षीय भाऊ व त्याच्या मुलाविरुद्ध खटला दाखल केला. त्यावर बहिणी खरी माहिती दडपत असल्याचा दावा भावाने केला. या भावंडांच्या वडिलांचे 2006 मध्ये तर आईचे 2019 मध्ये निधन झाले होते.
भावाने न्यायालयात युक्तीवाद केला की, त्याला वडिलांनी स्वत:च्या मिळकतीतून खरेदी केलेले तीन प्लॅट्स गिफ्ट दिले होते. बहिणींनी सुरुवातीला यावर कुठलाही आक्षेप घेतला नाही. मात्र गिफ्ट दिलेल्या फ्लॅटची विक्री केल्यानंतर बहिणींनी हक्कासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. बक्षिसपत्र केलेल्या फ्लॅटच्या विक्रीतून मिळवलेल्या मालमत्तेवर बहिणी आपला हक्क सांगू शकत नाही, असे म्हणणे भावाने मांडले.
कायद्याने वडिल स्वतःच्या मिळकतीतून उभी केलेली मालमत्ता आपल्या वारसाला बक्षिस किंवा गिफ्ट म्हणून देऊ शकतात. मात्र अशा प्रकारच्या मालमत्तेला संयुक्त कुटुंबाची मालमत्ता म्हटले जाऊ शकत नाही. न्यायालयापुढे आलेल्या प्रकरणात प्रथमदर्शनी दोन मुद्द्यांमुळे बहिणींच्या बाजूने निर्णय घेतला जाऊ शकत नाही. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे आई-वडिलांची एक मालमत्ता विकली गेली होती, त्यावेळी त्यातील हिस्सा बहिणींनाही दिला गेला होता. दुसरा मुद्दा म्हणजे या वादात कौटुंबिक सामोपचाराचाही प्रयत्न केला गेला होता