रविवार राज ठाकरेंनीच गाजवला. कारण रविवारी अचानक आपल्या दौऱ्यात बदल करून नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर शिवतीर्थावर नेमकी चर्चा काय? ही मनसे भाजपच्या युतीची चर्चा आहे का? असे अनेक सवाल राजकारणात विचारले जाऊ लागले. या भेटीचा सस्पेन्स एखाद्या कथानकाला लाजवेल एवढा वाढला. त्यावर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. भाजप नेत्यांचे सूर तर शनिवारच्या राज ठाकरेंच्या भाषणानंतरच बदलले आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या भेटीवर टीकेची झोड उडवली.
नितीन गडकरी आणि राज ठाकरे हे दोघेही चांगले मित्र आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र शनिवारी राज ठाकरेंनी महाविकास आघाडी तयार झाल्यावरून सरकार स्थापनेच्या अडीच वर्षानंतर सडकून टीका केली. त्यानंतर मात्र ही भेट केवळ स्नेह भेट राहिली नाही. या भेटीबाबत खुद्द नितीन गडकरी यांनीही भाष्य केलं आहे.
या भेटीबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईची प्रकृती बघायची होती. तसेच त्यांनी नवीन घर पहायला मला बोलवलं होतं. म्हणून मी आज त्यांच्याकडे भेटायला आलो.
परवा मंगेशकरांना जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा ते म्हणाले एकदा घरी या. घर आम्ही नवीन बांधलंय तेही बघाल आणि आईशीही भेट होईल, म्हणून मी त्यांना भेटायला आलो. या भेटीचा राजकारणाशी काहीच संबंध नाही. ही पूर्णपणे व्यक्तीगत आणि पारिवारीक भेट होती. त्यांचे माझे संबंध गेल्या तीस वर्षांपासून आहेत. त्यामुळे आजच्या भेटीचा राजकारणाशी कुठलांही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया भेटीनंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी दिली आहे. नितीन गडकरी जरी ही भेट राजकीय नसल्याचे सांगत असले तरी या भेटीचं टायमिंग आणि राज ठाकरेंनी शिवतीर्थावर घेतलेली भूमिका पाहता, अनेकांना ही मनसे-भाजपच्या युतीची सुरूवात वाटू लागली आहे.
मात्र या भेटीबाबत भाजप नेत्यांना विचारले असता, अशा भेटी फक्त वयक्तीक भेटी नसतात. अशा भेटीत ही राजकीय चर्चा ही होतच असते. त्यामुळे भविष्यात भाजप आणि मनसेची सकारात्मक चर्चा होऊ शकते. कारण राज ठाकरेंनी शिवतीर्थावर हिंदुत्वाची घेतलेली भूमिका ही आमच्याशी जुळणारी भूमिका आहे. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तर या भेटीबाबत सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता.
भविष्यात मनसेसोबत युतीचा प्रस्ताव आल्यास त्याबाबत आमच्या कोर कमिटीत चर्चा होईल, मगच काय तो निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच शिवसेनेबरोबर भविष्यात युती होणार नाही म्हणत त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र या भेटीवर सडकून टीका केली आहे.