तीन दिवस उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी सोमवारी दुपारी 3 वाजता एका अल्पवयीन मुलाला मृत घोषित केलं. मंगळवारी सकाळी 10 वाजता त्याचे कुटुंबीय मृतदेह घेऊन आपल्या घरी पोहोचले. मात्र, मृत्यूनंतर 19 तासांनी त्याच्या शरीरामध्ये काही हालचाली जाणवू लागल्या. यानंतर तात्काळ त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याठिकाणी त्याच्यावर 4 तास उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच या मुलाचा मृत्यू झाला. संपूर्ण दिवसभराचा हा घटनाक्रम पूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला. ही घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील आहे.
मानधाताच्या डिहवा गावातील 17 वर्षीय कमलेश मौर्य तब्येत खराब होती. याच कारणामुळे तीन दिवसाआधी कुटुंबीय त्याला प्रयागराज येथे घेऊन गेले आणि त्याला एक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोमवारी दुपारी डॉक्टरांनी कमलेशला मृत घोषित केलं. रुग्णालयाचं बिल भरायला उशीर झाल्यामुळे रात्री हे सर्व तिथेच थांबले. मंगळवारी सकाळी 10 वाजता कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन घरी पोहोचले तेव्हा त्याला मिठी मारू लागले.
याच दरम्यान अचानक कमलेशच्या शरीरात काही हालचाली जाणवू लागल्या. हे पाहून कुटुंबीयदेखील हैराण झाले. तात्काळ त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. त्याची नाडी तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. यानंतर कुटुंबीया तात्काळ कमलेशला एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तिथे भर्ती केल्यानंतर त्याला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. चार तास कमलेश श्वास घेत होता मात्र दुपारी दोनच्या सुमारास त्याचा श्वास थांबला. यानंतर कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन घरी परतले.