अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हाती सत्ता आल्यानंतर त्याबाबत भारताची भूमिका ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पार पडली. यात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की येत्या काही दिवसात अफगाणिस्तानात अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक पावले उचला.
एका वरिष्ठ सूत्रानं सांगितलं, की पंतप्रधान मोदी म्हणाले भारतानं केवळ आपल्या नागरिकांचं रक्षण न करता, भारतात येण्याची इच्छा असलेल्या शिख आणि हिंदू अल्पसंख्यांकांचेही रक्षण करून त्यांना आश्रय द्यायला हवा. यासोबतच आपल्याला त्या अफगाण बांधवांचीही मदत करायला हवी, जे भारताकडे मदतीची मागणी करत आहेत.
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण हेदेखील उपस्थित होते. देशातून बाहेर असल्यामुळे या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित राहू शकले नाहीत.
सरकारमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीला अफगाणिस्तानमधील सद्यस्थिती, सुरक्षा आणि राजकीय परिस्थितीविषयी महत्त्वाची माहिती देण्यात आली. या समितीला भारतीय दूतावासाचे अधिकारी, भारतीय समुदायाचे काही सदस्य आणि भारतीय माध्यमांच्या व्यक्तींना बाहेर काढण्याबाबत माहिती देण्यात आली.
तालिबानने रविवारी काबूलमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला. सूत्रांनी सांगितलं, की भारत सरकार अफगाणिस्तानमधील सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. अफगाणिस्तानातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी ते वेळोवेळी अॕडव्हायजरी जारी करत आहेत, ज्यात त्यांना त्वरित भारतात परत येण्याचे आवाहन केलं जात आहे.