अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अखेर सोमवारी जाहीर केला़. पहिली प्रवेश यादी ३ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. अकरावीचा अर्ज पूर्ण भरण्यासाठी आता बुधवापर्यंत (२७ जुलै) वेळ मिळणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेने वेग घेतला असून, शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक सोमवारी जाहीर केले. त्यानुसार अकरावीची पहिली प्रवेश यादी ३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. सध्या अकरावीचा प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, अर्ज भरण्यासाठी २७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पहिल्या फेरीची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी (ता.२८) प्रसिद्ध होईल. त्यावरील हरकती, आक्षेप विचारात घेऊन त्यानुसार पहिल्या फेरीची प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे. अर्जाचा भाग दोन भरून (महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम) अंतिम केलेला अर्ज (लॉक असलेले अर्ज) प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेण्यात येणार आहेत.