आषाढी एकादशी यात्रेनिमित्ताने येत्या 20 जुलैला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली जाणार आहे. या महापूजेच्या वेळी मानाचा वारकरी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत विठ्ठल मंदिरातील विणेकरी यांना उपस्थितीत राहण्याचा मान मिळणार आहे. नुकतंच पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी याबाबतची माहिती दिली.
नुकतंच मंदिर समितीकडून मंदिरात सेवेसाठी असलेल्या चार विणेकऱ्यांमधून चिठ्ठी उडवून मानाचा वारकरी निवडला जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे मंदिरातील विणेकऱ्यांमधूनच मानाचा वारकरी निवडला जात आहे.
यापूर्वी आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी रांगेत उभारलेल्या भाविकांमधून वारकरी दाम्पत्याची निवड केली जाते. मुख्यमंत्र्यांसोबतच्या महापूजेला उपस्थित राहण्यासाठी मानाचा वारकरी म्हणून त्या दाम्पत्याकडून पूजा केली जाते, अशी प्रथा वर्षांनुवर्षे चालत आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ही परंपरा बंद आहे. त्याऐवजी विठ्ठल मंदिरातील विण्याची सेवा करणारे किंवा विणा घेऊन उभे असणाऱ्या सेवेकऱ्यांमधून मानाचा वारकरी निवडला जातो. यंदाही मानाचा वारकरी निवडण्याची प्रक्रिया मंदिर समितीकडून सुरु झाली आहे. यानुसार लवकरच त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून ही निवड केली जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाकडून येत्या 17 ते 25 जुलैपर्यंत पंढरपूर शहराबरोबरच परिसरातील दहा गावात संचारबंदी लागू केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची प्रतिकात्मक आषाढी वारी होत आहे.
वारीकाळात पंढरपूरला राज्यभरातील वारकरी येण्याची शक्यता असते. त्यामुळे पंढरपूर शहराबरोबरच परिसरातील 10 गावात संचारबंदी करण्याची प्रशासनाची तयारी केली आहे. पंढरपूर शहराबरोबरच परिसरातील 10 गावात संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव ग्रामीण पोलिसांनी जिल्हाधिकार्यांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.