पुण्यातील रुग्ण संख्या घटल्याने जम्बो कोव्हिड सेंटर बंद

काही दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पुण्यातील परिस्थिती आता झपाट्याने सुधारताना दिसत आहे. कारण, कोरोना (Coroanvirus) रुग्णांची संख्या घटल्यामुळे सीओईपीच्या मैदानावरील जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याच्यादृष्टीने हे चांगले लक्षण मानले जात आहे.
जम्बो सेंटरमधील रुग्ण कमी झाल्यानंतर 1 जून रोजी रुग्णालयातील 300 ऑक्सिजन खाटा कमी करण्यात आल्या होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर जम्बो रुग्णालय 15 जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेमुळे 22 मार्चपासून जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले होते. दुसऱ्या लाटेत 22 मार्च ते 1 जुलै दरम्यान एकूण 3009 रुग्ण जम्बोमध्ये दाखल झाले होते. त्यापैकी 1909 जण बरे होऊन घरी परतले होते. तर 654 जणांचा मृत्यू झाला होता. पुन्हा गरज पडल्यास हे जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा कार्यान्वित केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

आगामी काळात कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असलेल्या व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देण्याची योजना महानगरपालिकेने आखली आहे. महापालिकेच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्‍यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम गुरुवारपासून लसीच्या (Coronavirus Vaccine) उपलब्धतेनुसार राबविली जाईल, अशी माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली. याशिवाय सध्या पुणे महानगरपालिकेकडून दिव्यांग, रस्त्यांवरील नागरिक, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे लसीकरण सुरु असल्याचेही अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

ऑक्सिजन निर्मितीत मुंबईची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
कोरोना संकटाचा सामना करताना महाराष्ट्रात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन ऑक्सिजन’च्या माध्यमातून राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारले जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मितीत मुंबईची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु आहे. मुंबई महापालिकेच्या 5 रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.