उद्या आदित्य ठाकरे यांना लग्नासाठी मुलगी बघायची वेळ आली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारला पत्र लिहतील, अशी उपरोधिक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्य सरकार काही झाले की केंद्र सरकारकडे बोट दाखवते, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासंदर्भात भाष्य केले. राज्य सरकाकडून संभाजीराजे यांची हेरगिरी होत असल्याची बाब समोर आली आहे. मी याचा निषेध करतो. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील सरकार हे कोडगं आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा दिला तर कोणावरही परिणाम होणार आहे का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला.
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय नव्हती. शरद पवार आजारी असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला गेले होते. फडणवीस यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यामध्ये काहीही राजकीय नव्हते. आजदेखील देवेंद्र फडणवीस हे जळगावात नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
संजय राऊत यांना सिल्व्हर ओक येथे झालेल्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी विचारण्यात आले. तेव्हा संजय राऊत यांनी या भेटीमुळे महाविकासआघाडी सरकार अस्थिर होण्याचा दावा फेटाळून लावला. महाराष्ट्रातील राजकीय नेते एकमेकांना अशाप्रकारे भेटत असतात, आपल्याकडे तशी परंपरा आहे. शरद पवार यांची तब्येत सध्या थोडीशी खराब आहे. त्यामुळे फडणवीसांनी सदिच्छा भेट दिली असेल, असे राऊत यांनी म्हटले.