बॉलिवूड कलाकारांचे प्रेम असो वा ब्रेकअप, ते चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत राहतात. बॉलिवूडमधल्या काही प्रेमकथा केवळ एका वाईट टप्प्यावर येऊन थांबल्या असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अशा दुःखद ब्रेकअप कथांपैकीच एक होती अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांची प्रेमकथा. लग्नापर्यंत पोहचलेली ही प्रेमकथा अचानक ‘ब्रेकअप’च्या वळणावर येऊन थांबली होती.
जेव्हा, राणी आणि अभिषेकच्या प्रेमाची चर्चा सुरू होती, तेव्हा दोघांचेही चाहतेही खूप खूष झाले होते. याचे कारण म्हणजे राणी आणि अभिषेक यांना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी होती. रील लाईफमध्ये गाजलेली ही जोडी रिअल लाईफमध्ये देखील त्यांना पाहायची होती. दोघांच्या लग्नाविषयी अनेक बातम्या आल्या, पण जेव्हा या जोडीच्या ब्रेकअपची गोष्ट समोर आली तेव्हा त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
‘बंटी और बबली’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘युवा’ असे चित्रपट देणारे अभिषेक आणि राणी एकाच वेळी एकमेकांच्या प्रेमात पडले होते. करिष्मा कपूरशी साखरपुडा मोडल्यानंतर अभिषेकच्या आयुष्यात राणीची एंट्री झाली होती. करिष्माशी ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री राणी मुखर्जी त्याच्या आणि बच्चन कुटुंबाच्या अगदी जवळ आली. असे म्हणतात की, ‘बंटी और बबली’ या चित्रपटादरम्यान दोघांची चांगली मैत्री जमली होती, ज्याचे नंतर प्रेमात रूपांतर झाले.
एक काळ असा होता की, राणी आणि अभिषेकच्या अफेअरच्या बातम्या सर्वत्र प्रकाशित व्हायच्या. या जोडीनेही माध्यमांकडे कुठलीही वाच्यता न करता त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते. दोघेही अवॉर्ड शोमध्ये एकत्र दिसायचे. त्यांच्या लग्नाची बातमी चर्चेत असतानाच ब्रेकअपची बातमी समोर आली, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
अभिषेक आणि राणीच्या ब्रेकअपनंतर, अभिषेकच्या कुटुंबातील एका सदस्यामुळे दोघेही विभक्त झाल्याची बातमी समोर आली होती. असे म्हणतात की, अभिषेकची आई जया बच्चन याच दोघांच्या नात्यातील वितुष्टाला कारणीभूत ठरल्या. पण या दोन्ही कलाकारांनी यावर कधीही प्रतिक्रिया दिली नाही. असं म्हणतात की, जया बच्चन यांनी दोघांच्या नात्याला संमती दिली होती. पण त्यांचे नाते तुटण्यामागे कारण ठरला ‘ब्लॅक’ चित्रपटाचा एक किसिंग सीन, जो अमिताभ बच्चन आणि राणी यांच्यादरम्यान चित्रित केला गेला होता. राणीने हा सीन करू नये, अशी जया बच्चन यांची इच्छा होती. पण अभिनेत्रीने त्याला नकार दिला. ज्यामुळे जया बच्चन संतापल्या.