महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या MPSC परीक्षेची जाहिरात न काढल्यामुळे आता विद्यार्थी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे गेल्या दीड वर्षापासून MPSC परीक्षेची जाहिरात काढण्यात आलेली नाही. या वेळकाढू धोरणामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने MPSC परीक्षेची जाहिरात काढण्याबरोबरच वयोमर्यादेतही वाढ करावी, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट राईट्स संघटनेने केली आहे.
या संघटनेने यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवले आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवण्याचा शब्द दिला होता. मात्र, अद्याप वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय झालेला नाही. तसेच एमपीएससीची जाहिरातही काढण्यात आलेली नाही. परिणामी अनेक विद्यार्थी चिंतेत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने या परीक्षेसाठी वयोमर्यादा एका वर्षाने वाढवण्याची घोषणा करावी, असे या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी एमपीएससीचे विद्यार्थी दिवसभर रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं 14 मार्चची परीक्षा 21 मार्चला घेण्याचे आणि त्यासोबतचं 11 एप्रिलला होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणं होईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केले होते.
या आंदोलनानंतर महिनाभरातच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी स्वत:हून केली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना कोरोना झाला होता. दोन विद्यार्थ्यांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.