केंद्रीय श्रम मंत्रालयानं देशातील 6 कोटी नोकरदारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 6 कोटी खातेधारकांच्या खात्यामध्ये व्याज जमा करणार आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयानं या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. जुलै महिन्याच्या शेवटी नोकरदारांच्या खात्यात व्याज जमा केलं जाणार आहे.
केंद्र सरकारनं आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज देण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर केला होता. गेल्या सात वर्षांमधील हा सर्वात कमी व्याज दर आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 8.65 टक्के होता. तर, 2019-20 मध्ये EPFO खातेधारकांना व्याज मिळवण्यासाठी तब्बल 8 ते 10 महिने वाट पाहावी लागली होती.
झी बिझनेसनं दिलेल्या बातमीनुसार 6 कोटी खातेधारकांच्या खात्यात प्रॉव्हिडंड फंड खात्यावरील व्याज जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत जमा केलं जाईल. केंद्रीय श्रम मंत्रालयानं याला मंजुरी दिली आहे.
मार्च महिन्यात श्रीनगरमध्ये श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय झाला होता.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या काळात केंद्र सरकारने ईपीएफओ खाते असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने खातेधारकांना त्यांच्या पीएफ अकाउंट मधून तीन महिन्याची जमा रक्कम अँडव्हान्स स्वरूपात काढण्यासाठी मुभा दिली आहे. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत देखील सरकारने ही सुविधा उपलब्ध करून दिली होती.
ईपीएफओने जाहीर केलेल्या निर्णयानुसार खातेधारक कर्मचारी कोविड-19 अँडव्हान्स सुविधेचा वापर करून पैसे काढू शकतात. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात झालेल्या रकमेपैकी 75 टक्के किंवा तीन महिन्यांच्या मूळ पगाराच्या बरोबरची रक्कम काढता येईल. यासंदर्भात केंद्रीय श्रम मंत्रालयानं एक नोटिफिकेशन जारी केलं आहे.