मंगळवारी अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियाला धडकलेल्या भीषण ‘बॉम्ब चक्रीवादळ’ने मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला आहे. या वादळामुळे कॅलिफोर्नियातील सुमारे 3 लाख घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून लोकांना अंधारात राहावे लागत आहे.
डिसेंबरपासून कॅलिफोर्निया हे चक्रीवादळांचे केंद्र बनले आहे. यामुळे सिएरा नेवाडा आणि इतर पर्वतांमध्ये पावसामुळे पूर आणि विक्रमी बर्फवृष्टी झाली आहे. या भागात 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. खराब झालेले रस्ते आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने कोट्यवधी डॉलरचे नुकसान झाले आहे.
नॅशनल वेदर सर्व्हिस (NWS) च्या अहवालानुसार, 80 mph (126 km/h) वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक भागात झाडे आणि वीजवाहिन्या उन्मळून पडल्या. त्यामुळे महामार्ग आणि हवाई सेवा बंद करावी लागली. रस्त्यांवर गाड्या तरंगताना दिसत होत्या.
कॅलिफोर्निया ऑफिस ऑफ इमर्जन्सी सर्व्हिसेस (COES) च्या प्रवक्त्या डायना क्रॉफ्ट-पेलायो यांनी सांगितले की, राज्यभरातील 14,000 हून अधिक लोकांना पुरामुळे उंच सखल भागात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर आणखी 47,000 रहिवाशांना स्थलांतर करण्याचा इशारा देण्यात आला.
लॉस एंजेलिसमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील हवामान शास्त्रज्ञ डॅनियल स्वेन यांनी सांगितले की, हे एक विनाशकारी, शक्तिशाली आणि अचानक आलेले वादळ होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत हे वादळ कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते नेवाडा आणि ऍरिझोनाच्या दिशेने सरकत आहे. सिएरा नेवाडा, ऍरिझोना, सॅन डिएगो काउंटी, तुलार काउंटी, लॉस एंजेलिस इ. भूभागावर या वादळाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे.