मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढी पाडवा मेळाव्यातल्या भाषणात खळबळजनक व्हिडिओ दाखवले. मुंबईतल्या माहिमच्या समुद्र किनाऱ्यावर अनधिकृतपणे मजार बांधली गेल्याचा व्हिडिओ राज ठाकरे यांनी दाखवला, तसंच या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली नाही, तर त्या मजारीसमोरच गणपतीचं मंदिर उभारू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. माहिम दर्गाच्या परिसरात समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी भाषणात केला, त्यानंतर आता पोलीस या जागेची पाहणी करून पडताळणी करणार आहेत. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी पडताळणी करणार आहेत. दरम्यान या भागातले आमदार सदा सरवणकर हेदेखील गुरूवारी तिकडे जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती आहे.
ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रांतात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस दोघांकडून जागा पडताळली जाणार आहे. जर तथ्य असेल आणि अनधिकृत बांधकाम असेल तर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.
हे इथं असलेल्या मगदूनबाबाच्या समोर, अनधिकृत मजार बांधली जात आहे. दोन वर्षांमध्ये हे उभं केलं आहे, लोकांचं लक्ष नाही. महापालिकेचे लोक फिरतात, पाहिलं नाही. दिवसाढवळ्या समुद्रात नवीन हाजी अली तयार करणार, आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना पोलीस कमिशनर, पालिका आयुक्त आजच सांगतो, महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, हे जर तोडलं नाही, त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्या शिवाय राहणार नाही. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर आमच्याकडे दुर्लक्ष करा, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.