राज्य सरकारने आज एक पत्रक काढलं आहे. त्यानुसार राज्यात सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोककलांना मोकळ्या जागेत कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे तमाशा, शाहिरी, भारुड या लोककलांना कार्यक्रम सादर करण्यास परवानगी नव्हती. आपल्यालाही सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी तमाशा लोककलावंत परिषदेने शासनाकडे केली होती. याअनुषंगाने बंदीस्त सभागृहे आणि मोकळ्या मैदानात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व लोककला सादर करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. यात तमाशा, दशावतार, भारुड, शाहिरी इत्यादी कार्यक्रमासह टुरिंग टॉकिजला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या सर्वांना कोरोनाच्या अटींचे पालन करण्याचे बंधनही घालण्यात आलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तमाशा कलावंताना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन लागल्याने या लोककला कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. कार्यक्रम बंद झाले आणि उत्पन्नाचं काहीच साधन नाही अशी अवस्था या कलावंतांवर ओढवली होती. त्यामुळे या कलावंतांनी शासनाकडून मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या कलावंतांनी खासदार सुप्रिया सुळे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांचीही भेट घेऊन त्यांच्यासमोर या कलावंतांनी कैफियत मांडली होती. शरद पवार यांनी तर सरकारला पत्रं लिहून या कलावंतांना मदत करण्याचे आवाहन केले होते.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. शिवाय कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज होता. मात्र, तिसरी लाट आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने अनेक गोष्टींना शिथिलता दिली होती. मात्र, लोककलावंतांना कोणताही दिलासा दिला नव्हता. त्यामुळे सरकारने आज घेतलेल्या निर्णयामुळे लोककलावंतांना मोठा दिलासा मिळाला आहे.