नुकताच उत्तर प्रदेशातील शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचप्रकारे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत हे देखील दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत.
आज होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विशेष उपस्थितीत असणार आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रमोद सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. गोव्याचा शपथविधी विशेष असल्याने याकडे आज देशभराचं लक्ष असणार आहे.
कारण, गोव्याच्या 40 जागा असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे काँग्रेसला एकत्र घेऊन विरोधकांची मोट बांधण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा प्रयत्न केला. त्याविषयी शिवसेना नेते संजय राऊतांनी अनेकदा बोलूनही दाखवलं. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांचे प्रयत्न फोल ठरल्याचं दिसून आलं. यामुळे गोव्याच्या शपथविधीकडे देशभराचं लक्ष असणार आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची प्रमोद सावंत दुसऱ्यांदा शपथ घेतील. डॉ. शामप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रमोद सावंत शपथविधी सोहळा पार पडेल. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात 11 नव्या मंत्र्यांचा समावेश होण्याची सूत्रांची माहिती आहे. तर या शपथविधीला सोहळ्याला अनेक दिग्गज नेते, उद्योजकांची उपस्थिती असण्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय.
गोव्यात मुख्यमंत्रीपदावरुन रच्चीखेच सुरु असल्याचं यापूर्वी अनेकदा बोललं गेलं. गोव्याच्या राजकारणात त्यामुळे एकदा चढाओढही पाहायला मिळाली होती. याआधीच विश्वजीत राणे आणि प्रमोद सावंत यांच्यातील स्पर्धाही अनेकदा चर्चिली गेलेलीय. अशातच निवडणुकीतील विजयानंतर विश्वजीत राणेंनी मतदारांचे आभार मानताना जाहिरातही प्रसिद्ध केली होती. मात्र या जाहिरातीमध्ये प्रमोद सावंत यांचा फोटो कुठेच दिसून आला नव्हता. मात्र, प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्यानं अखेर मुख्यमंत्रीपदी सुरू असलेली रस्सीखेच थांबली.