आज दि.२३ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग; अखेर सांगलीतील ‘त्या’ अनधिकृत बांधकामावर हातोडा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगलीतल्या वादग्रस्त मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर महापालिका आणि पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. विभागाकडून या ठिकाणी नव्या रचनेच्या माध्यमातून सदर जागेची मोजणी करण्यात आली. यानंतर महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी सदर जागेवर बांधण्यात येणारे बांधकाम हे अनधिकृत असल्याचा स्पष्ट केलं आहे. सदरच्या जागेवर सांगली महापालिका शाळेचं आरक्षण आहे. सुमारे सव्वा एकर क्षेत्रावर हे आरक्षण आहे. त्यामुळे या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी स्पष्ट केले आहे.

माहीम, सांगली पाठोपाठ आता नाशिकमध्येही अतिक्रमणावरून वाद; हिंदुत्ववादी संघटनाचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (बुधवार 22 मार्च) पक्षाच्या पाडवा मेळाव्यात माहीम आणि सांगलीत अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप केला होता. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने त्वरीत हालचाल करत दोन्ही ठिकाणी हातोडा चालवला आहे. माहीम आणि सांगली पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील दर्ग्याच्या अतिक्रमणावरून वाद उभा राहिला आहे. नाशिकमध्ये झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या हुंकार सभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी या दर्ग्याच्या बाजूला असलेल्या मंदिरात भेट देत अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे.

अभिनेता इमरान खान आणि अवंतिकाचा घटस्फोट?

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाचा अभिनेता इमरान खान त्याच्या बायकोपासून वेगळा राहत असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगली होती. आता इमरान खान आणि त्याची बायको अवंतिका मलिक यांचा घटस्फोट झाल्याचं बोललं जात आहे. त्याला कारणही तसंच आहे, अवंतिकानं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टमुळं दोघांचा घटस्फोट झाल्याची बोललं जात आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

राज ठाकरेंच्या सभेनंतर भाजपकडून उद्धव ठाकरेंना टाळी? 

आज विधान परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. युती तोडल्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला तर उद्धव ठाकरे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र याचवेळी बोलताना मुनगंटीवार यांनी  ‘उद्धवजी पुन्हा एकदा शांततेनं विचार करा, झाड वाढवायचा विचार करा’ असं म्हणत ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे युतीची ऑफरच दिल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. उद्धवजी मी भेटून तुम्हाला स्वतः सांगायचो फळ येतील पण तुम्ही झाडाशी नातं तोडलं. तुम्ही झाडाशी नातं तोडलं त्याला आता मी काय करणार? मी येवून व्यक्तीगत सांगायचो की या झाडाला कोणतं खत पाहिजे, मात्र तुम्ही ते खत न टाकता दुसरंच खत टाकलं. मी एकदा नाही तीनदा विनंती केली. आजही वेळ गेलेली नाही शांततेत विचार करा, झाड वाढवायचा विचार करा असं मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं.

बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा, राज्यातील 15 जिल्ह्यांत पावसाची शक्यता

राज्यात मागच्या आठवड्यात झालेल्या पावसाने सुमारे हजारो एकर शेतीपिकांचे नुकसान झाले. दरम्यान बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा  सक्रीय झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या 24 तासांत काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे.

राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात मागच्या 24 तासांत कोकण, उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस झाला आहे. तर आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

“…म्हणून नरेंद्र मोदी सतत रागात असतात”, अरविंद केजरीवाल यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

दिल्लीतल्या जंतर-मंतर मैदानात आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तोफ कडाडली. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना झोप येत नाही. त्यामुळेच ते सतत रागात असतात. पोस्टरवरील राजकारणावरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला. केजरीवाल म्हणाले की, “१०० वर्षांपूर्वी इंग्रजांनीदेखील पोस्टर लावण्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली होती.”

केजरीवाल म्हणाले की, “भगत सिंग यांनी विचारदेखील केला नसेल की, १०० वर्षांनी भारताला असा पंतप्रधान मिळेल जो पोस्टर लावण्याप्रकरणी कलम १३८ अंतर्गत गुन्हा नोंदवेल.” केजरीवाल यांचं हे वक्तव्य दिल्लीत लावलेल्या ‘मोदी भगाओ, देश बचाओ’ या पोस्टरबाबत होतं.

मोदींचा ‘तो’ उद्धार राहुल गांधींना पडला महाग; दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाने सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवलं असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे.

पाकिस्तान, अफगाणिस्तानात तीव्र भूकंप; १२ ठार, २५० जखमी; ६.८ रिश्टर स्केल तीव्रता

अफगाणिस्तानात आलेल्या ६.८ रिश्टर स्केलच्या तीव्र भूकंपामुळे अफगाणिस्तानसह पाकिस्तानलाही हादरे बसले. त्यामुळे दोन्ही देशांतील सुमारे १२ जण ठार, तर २५० जण मृत्युमुखी पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

पाकिस्तानी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानच्या हिंदूकुश प्रदेशात १८० किलोमीटर खोलीवर होते. हे धक्के राजधानी दिल्ली परिसरासह उत्तर भारतातील अनेक भागांत जाणवले. पाकिस्तानात लाहोर, इस्लामबाद, रावळपिंडी, क्वेट्टा, पेशावर, लक्की मारवत, गुजरनवाला, सियालकोट, कोट मोमिन, चकवाल, कोहाट आणि गिलगिट-बाल्टिस्तान भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. वाहिनींच्या चित्रफितीत भयग्रस्त नागरिक रस्त्यांवर उतरल्याचे दिसत होते.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.