रोटरी क्लब ऑफ़ जळगाव सेंट्रलतर्फे केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव संचलित सेवा वस्ती विभाग हरी विठ्ठल नगर येथे ‘ मासिक पाळीच्या सर्व समस्या व त्यावरील मार्गदर्शन ‘ या आरोग्य विषयक कार्यक्रमातून जनजागृती करण्यात आली.
️या कार्यक्रमात स्त्रीरोगतज्ञ डॉ. वैशाली जैन यांनी मासिक पाळी व मेनॅपाॅज यामध्ये वयानुसार, आहार मुळे व तसेच महत्त्वाच्या कारणामुळे निर्माण झालेल्या समस्या, हार्मोनल अस्थिरता यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे, कशा पद्धतीने त्यातून व्यवस्थितरित्या बाहेर येऊन निरोगीपणा पुन्हा आणला पाहिजे, आहार नेमका कसा असावा व आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी कसे व किती महत्वपूर्ण आहे हे सांगितले.
त्यानंतर आयुर्वेदिक तज्ञ डॉ. प्रणिता वडोदकर यांनी आयुर्वेदानुसार मासिक पाळी म्हणजे नेमके काय आहे, त्याचे महत्त्व व गरिमा किती आहे, त्याकडे कशा पद्धतीने बघायला हवे, काही समस्या असतील तर त्यावरील उपचार नेमके कसे असावेत व आहार कसा असावा याची माहिती सांगितली.
आयुर्वेदिक आहार तज्ञ डॉ. विद्या चौधरी यांनी आरोग्यप्राप्तीसाठी हार्मोनल अस्थिरता व महत्त्वाच्या समस्या ह्याच्या निराकरणासाठी मानसिक आहार ही किती अनन्य साधारण महत्त्वाचा आहे आणि यामध्ये विचारांचा स्विकार करतांना कोणते विचार घ्यायचे, कोणत्या विचारांचा त्याग करायचा, ज्याने तुमची मानसिक शांतता कायम अबाधित राहिली पाहिजे आणि हे प्रयत्नपूर्वक स्वतःहून शिकणे, कृतीत आणणे व तिचे सातत्य राखणे कसे व किती महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. शेवटी प्रश्न उत्तराच्या स्वरुपात हा सुसंवादात्मक कार्यक्रम संपन्न झाला.
रोटरी इलाईट व केशव स्मृती प्रतिष्ठान ह्यांच्या एकत्रितपणे संचलित प्रोजेक्टमधून घेतलेले 5 सॅनिटरी पॅडचा एक पॅक प्रत्येक महिला व किशोरवयीन मुलींना देण्यात आला. यासाठी अध्यक्ष विपूल पारेख, मानद सचिव रविंद्र वाणी, डॉ. वैजयंती पाध्ये, डॉ. दर्शना शाह व मनीषा खडके यांचे मार्गदर्शन लाभले. सेवा वस्तीतील महिलांद्वारे शिवलेल्या कापडी पिशव्यांचा संच डॉक्टरांना भेट देण्यात आला. प्रास्ताविक साधना दामले यांनी तर आभारप्रदर्शन स्नेहा खोब्रागडे यांनी केले.