औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकारणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दुकानांना सील ठोकल्यामुळे खासदार इम्तियाज जलील हे भडकले आणि त्यांनी काल (1 जून) कामगार कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

इम्तियाज जलील यांच्यासह 24 दुकानदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवाजवी दंड ठोठावल्या प्रकरणी इम्तियाज जलील हे कामगार कार्यालयात गेले होते. याचा व्हिडीओ समोर आला होता.

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून शहरातील अनेक दुकाने सील करण्यात आली आहेत. या सील केलेल्या दुकानांना मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला आहे. छोट्या व्यापाऱ्यांनासुद्धा मोठा दंड आकारला गेला आहे. हा दंड व्यापाऱ्यांना भरणे शक्य नाही. दंड भरणे शक्य नसल्यामुळे या दुकानदारांना आपली दुकाने सुरु करता येत नाहीयेत. याच कारणामुळे इम्तियाज जलील कामगार कार्यालयात गेले होते.

यावेळी जलील यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. त्यावर व्यापाऱ्यांची दुकाने कमीत कमी दंडामध्ये सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी जलील यांनी कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे केली. त्या मागणीलासुद्धा उलटसुलट उत्तर मिळाली. याच कारणामुळे जलील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती.

दरम्यान, राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत आहे. मात्र आता रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता निश्चित नियमानुसार औरंगाबादेत आजपासून दुकाने उघडण्यात आली आहेत. शहरात सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.