१ ते १५ फेब्रुवारीदरम्यान कोरोनाची
तिसरी लाट येऊ शकते
देशात कोरोना संसर्गाचा प्रसार चौपट वेगाने होत आहे. कोरोना दैनंदिन रुग्णांची संख्या दीड लाखांच्या पार गेली आहे, तर ओमायक्रॉन बाधितांचा आकडाही तीन हजाराहून अधिक झाला आहे. IIT मद्रास येथील गणित विभागातील प्राध्यापक डॉ. जयंत झा यांनी या संदर्भात गंभीर इशारा दिला आहे. देशभरात कोरोना वाढत आहे, अशा परिस्थितीत देशात १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. दिल्लीत या काळात ३५ ते ७० हजार प्रकरणं अपेक्षित आहेत.
सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार करू,
पवारांनी दिली एसटी कर्मचाऱ्यांना ग्वाही
करोनाचा ओमायक्रॉन नावाचा करोनाचा नवीन अवतार आल्यानं देशावर आणि राज्यावर संकट आलंय. या सगळ्या गोष्टीचा परिणाम राज्यातील अर्थकारणावर होतोय. त्यामुळे राज्यातील राज्य सरकारला त्याची मोठी आर्थिक किंमत द्यावी लागतीय, असे पवार म्हणाले. कृती समितीच्या सदस्यांचे काही प्रश्न आहेत, त्यातील काही प्रश्न कृती समितीने सरकारच्या नजरेत आणून दिलेत. त्याप्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्याचे सरकारचे प्रयत्न असतील, असं राज्य सरकारने सांगितलं. एसटी चालू झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांनी कामावर यायला पाहिजे, असं पवार म्हणाले. तुमच्या इतर प्रश्नांवरही सरकार सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार करेन, अशी ग्वाही यावेळी पवारांनी दिली.
शाळा बंद ठेवता, परमिट रूम सुरू हे
सरकारचे कोणते धोरण : विखे-पाटील
“राज्यामध्ये फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय तुम्ही एका बाजूला घेता. दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही परमीट रुम सुरु ठेवण्याचा निर्णय घेता. दुर्दैवाने असा निर्णय घेण्यात आला होता जेव्हा मंदिरं बंद होती आणि मदिरालये सुरु होती. सरकारीच दिशा काय आहे? केवळ टास्कफोर्स गठीत केल्याने टास्कफोर्सच्या मागे लपायचं आणि राज्यावर वाटेल तशी बंधनं लागायची. केवळ सामान्य नागरिकांनीच बंधनं पाळावीत अशी सरकारची अपेक्षा आहे का?,” असा प्रश्न विखे-पाटील यांनी विचारलाय. “नुसते निर्बंध लावण्यापेक्षा सामान्यांना आधार वाटावा असे निर्णय जाहीर करायला पाहिजे होते,” असंही विखे-पाटील म्हणाले आहेत.
पुण्यात न्यूड फोटोचं प्रदर्शन
विरोधानंतर केले बंद
पुण्यातील फोटोग्राफर अक्षय माळी या तरुणाने येथे न्यूड फोटोचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. पण काहींनी विरोध दर्शवल्याने त्याला हे प्रदर्शन बंद करावं लागलं.
प्रदर्शनाबाबत अक्षय माळी म्हणाला की, या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. पण त्याच दरम्यान एक व्यक्ती आला आणि माझ्याकडे फोन दिला आणि तुमच्याशी एकाला बोलायाचं आहे सांगितलं. त्यावर मी फोन घेताच समोरील व्यक्ती म्हणाला की हे प्रदर्शन दोन मिनिटात बंद कर, अन्यथा आम्ही बंद करू. असे म्हणताच मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर व्यवस्थापनाने प्रदर्शन कोणालाही पाहू दिले नाही. या घडामोडीनंतर मी प्रदर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला”.
एकनाथ खडसे गिरीश महाजन
यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद
माजी मंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. गिरीश महाजनांना दुसऱ्यांदा करोना झाला आणि त्यांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून मी परवा त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावर गिरीश महाजनांना एकनाथ खडसेंना ठाण्याला पाठवावे असे म्हटले. मी त्यावर गिरीश महाजनांना बुधवार पेठेत पाठवावे असे म्हटले. बुधवार पेठेमध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिर आहे. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सद्बुद्धी येईल अशी माझी अपेक्षा होती. पण विकृत मनोवृत्तीचे लोक असल्यामुळे गणपतीच्या ऐवजी दुसरीच कल्पना यांच्या मनामध्ये आली. त्यामुळे मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणीप्रमाणे जसी दृष्टी तशी सृष्टी असे त्यांना वाटले. माझा दृष्टीकोन साफ आहे. त्यांनी गणपतीचे दर्शन घ्यायला हवं हा माझा त्यामागे हेतू आहे. त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपती गिरीश महाजनांना नवसाला पावेल अशी मी प्रार्थना करतो,” असे एकनाथ खडसे म्हणाले.
म्यानमारच्या आंग सान स्यू की यांना
चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
म्यानमारच्या एका न्यायालयाने देशाच्या निर्वासित नेत्या आंग सान स्यू की यांना आणखी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. करोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीरपणे वॉकी-टॉकी आयात केल्याबद्दल आणि त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी ६ डिसेंबर रोजी सू की यांना करोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि लोकांना भडकावण्याच्या इतर दोन आरोपांसाठी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
तुफान बर्फवृष्टीत भारतीय
जवानांनी केले नृत्य
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ आणि जम्मू-काश्मीरच्या फॉरवर्ड पोस्टवर सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे. पण कडाक्याच्या थंडीतही सीमेवर तैनात असलेल्या जवानांचा उत्साह कमी झालेला नाही. या तुफान बर्फवृष्टीत भारतीय जवानांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
अफगाणिस्तान वर्ल्डकप मधून
बाहेर पडण्याची शक्यता
१४ जानेवारीपासून वेस्ट इंडिजच्या मैदानावर आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. या विश्वचषकाचे सराव सामने आता खेळले जात आहेत आणि जवळपास सर्व संघ या स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजला पोहोचले आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट संघाला या विश्वचषकात सहभागी होणे कठीण जात आहे, कारण तालिबानशासित देशाच्या खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अद्याप व्हिसा घेतलेला नाही. अफगाण संघ कॅरेबियन देशात पोहोचलेला नाही, इंग्लंडविरुद्धचे आणि १२ जानेवारीला यूएईविरुद्धचे सराव सामने रद्द करावे लागले. अफगाणिस्तानला १६ जानेवारीला झिम्बाब्वेविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.
नाशिक-भुसावळ-इगतपुरी
मेमू एक्स्प्रेसचा श्रीगणेशा
एक अतिशय गोड आणि नाशिकरांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणारी बातमी. नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू एक्स्प्रेसचा श्रीगणेशा आजपासून झाला. तर दुसरीकडे नाशिक-मनमाड मार्गावरच्या रद्द झालेल्या 18 रेल्वे गाड्या आजपासून पूर्ववत होत आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची सोय होणार आहे. नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू ही रेल्वे गाडी आठ डब्यांची असणार आहे. ही गाडी भुसावळ जंक्शनवरून सकाळी 7 वाजता मार्गस्थ होईल.
इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक वस्तूं
किमतीत 5 ते 10 टक्क्यांची वाढ
देशात असलेला सेमी कंडक्टरचा तुटवडा आणि सातत्याने वाढत असलेल्या कच्च्या मालाचे दर यामुळे येणाऱ्या काळात इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वस्तुंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. महागाई वाढल्याने मजुरीचा देखील खर्च वाढला आहे. त्यामुळे उत्पादकाला आता पूर्वीच्या किमतीमध्ये वस्तूंची विक्री करणे परवडत नाही. फ्रिज, वाशिंग मशिन सारख्या घरगुती वापराच्या वस्तू महाग होऊ शकतात. घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक वस्तूंच्या दरामध्ये येत्या एप्रिलपर्यंत पाच ते दहा टक्के वाढीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पॅनासॉनिक, एलजी, हायर या कंपन्यांनी या आधीच दरवाढिचा निर्णय घेतला आहे. तर सोनी, हिताची, गोदरेज या कंपन्या देखील लवकरच आपल्या वस्तूंचे दर वाढू शकतात.
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या
परीक्षा पुढे ढकलल्या
कोरोनाचे झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा
28 जानेवारीचा पुणे दौरा रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 जानेवारीचा पुणे दौरा अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) दौरा रद्द झाल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आल्याची माहिती आहे.
SD social media
9850 60 35 90