कडाक्याच्या थंडीत आपण सर्वजण आपल्या घरात सुरक्षित आहोत. कारण सीमेवर रक्त गोठवणाऱ्या थंडीत आपले शूर जवान देशाच्या सुरक्षेसाठी २४ तास तैनात आहेत.
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ आणि जम्मू-काश्मीरच्या फॉरवर्ड पोस्टवर सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे. पण कडाक्याच्या थंडीतही सीमेवर तैनात असलेल्या जवानांचा उत्साह कमी झालेला नाही. या तुफान बर्फवृष्टीत भारतीय जवानांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
या व्हिडिओत भारतीय सैन्याचे जवान एक पारंपारिक नृत्य करताना दिसत आहेत. भारतीय सैन्याचे जवान ‘खुकुरी’ हा पारंपारिक नृत्य प्रकार सादर करत आहेत. हे जवान ज्या ठिकाणी नाचत आहेत त्या ठिकाणी सर्वत्र बर्फ साचला आहे आणि वरून बर्फवृष्टी सुरू आहे. भारतीय जवानांचा हा व्हिडिओ पाहून सर्वजण भारतीय सैन्याच्या कर्तृत्वाला सलाम करत आहेत.
ऊन असो, पाऊस असो की कडाक्याची थंडी, देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्यातील जवान आपली भूमिका अतिशय जबाबदारीने पार पाडत असतात. तापमानााचा पारा शून्याच्या खाली गेलेला असतानाही जवानांचा जोश जराही कमी झालेला दिसत नाही. देशवासियांचं रक्षण करण्यासाठी दिवसरात्र सीमेवर तैनात असणाऱ्या या जवानांचा हा व्हिडिओ पाहून प्रत्येक भारतीला अभिमान वाटतोय.
भारतीय लष्कराचे जवान सीमेवर देशाच्या रक्षणासोबतच सर्वसामान्यांच्या मदतीसाठीही नेहमीच एक पाऊल पुढे असतात. शनिवारी त्यांनी असे काम केले असून, त्याचे जोरदार कौतुक होत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय लष्कराचे जवान एका गर्भवती महिलेला सहा किलोमीटर चालत रुग्णालयात नेत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी हे काम जोरदार हिमवर्षावाच्या वेळी केलं.