आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank)आपल्या क्रेडिट कार्डच्या संबंधित सर्व सेवांचे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उशीरा कर्ज फेडीवर आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा देखील समावेश आहे. याबाबत बँकेकडून माहिती देण्यात आली आहे. बँकेच्या वतीने आपल्या ग्राहकांना एक एसएमएस देखील पाठवण्यात आला आहे. या एसएमएसमध्ये बँकेने म्हटले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना कळू इच्छितो की बँकेने क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व सेवांवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दहा फेब्रुवारीपासून सुधारित दर लागू होतील. नव्या दरानुसार बँकेच्या सर्व प्रकारच्या क्रेडिट कार्डवर 2.50 टक्के ट्रांझेक्शन फी आकारली जाईल. ही फी कमीत कमी 500 रुपयांपर्यंत असू शकते. तसेच ऑटो डेबिट फेल झाल्यास किंवा चेक बाऊंस झाल्यास देखील संबंधित ग्राहकांकडून दोन टक्के दंड वसूल करण्यात येईल.
बँकेच्या नव्या नियमानुसार जर तुमच्याकडे बँकेची 100 रुपये थकबाकी असेल तर त्यावर कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही. मात्र ही रक्कम जर 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत असेल तर त्यावर विलंब शुल्क म्हणून तुमच्याकडून 100 रुपयांची वसुली करण्यात येईल. जर तुमच्याकडे 501 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंतची थकबाकी असेल तर त्यासाठी तुमच्याकडून विलंब शुल्क म्हणून 500 रुपये आकारले जातील. जर ही थकबाकी 10,000 रुपये असेल तर 750 रुपये आणि 25,000 हजारांच्या आतील रकमेसाठी 900 आकारण्यात येणार आहेत.
ग्राहकांनी क्रेडिट कार्डशी संबंधित सेवांच्या शुल्कामध्ये करण्यात आलेल्या वाढीची नोंद घ्यावी, नवे शुल्क येत्या दहा फेब्रुवारीपासून लागू होतील. बँकेला सहकार्य करावे असे आवाहन देखील बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान ज्या ग्राहकांचे आयसीआसीआय बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट आहे, अशा ग्राहकांसाठी बँकेच्या वतीने लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड देण्यात येते अशा क्रेडिट कार्डवर बँकेकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही.