राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा मंगळवारी रात्री अपघात झाला आहे. या अपघातात आमदार मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर मुंडे यांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे.
यानंतर अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. धनंजय मुंडे यांची ७ आणि ८ क्रमांकाची बरगडी फ्रॅक्चर झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली. आता धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक असून त्यांना डिस्चार्ज कधी दिला जाईल, याची माहिती उद्या सायंकाळपर्यंत कळेल, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची अधिकची माहिती देताना अजित पवार म्हणाले, “काल (मंगळवार) रात्री अडीच वाजता धनंजय मुंडे यांचा परळीत अपघात झाला. आज त्यांना विशेष विमानाने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांची पूर्णपणे तपासणी केली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडे यांच्या सात आणि आठ नंबरच्या दोन बरगड्यांना फ्रॅक्चर झालं आहे. त्यांना २४ तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.