कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता संसर्ग साखळी तोडण्याची गरज असून, त्यासाठी काही दिवसांसाठी तरी कठोर निर्बंध लागू करावेच लागतील. मात्र, जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी पूर्वसूचना देऊन निर्णय घेण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात काही दिवस टाळेबंदी अटळ असल्याचे स्पष्ट संके त शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत दिले. दोन-तीन दिवसांत याबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्वच भागांत करोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याने आरोग्यसुविधा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. टाळेबंदीसारख्या कडक र्निबधांची गरज असून, अन्यथा १५ एप्रिलनंतर परिस्थिती कठीण होईल, याकडे कुंटे यांनी सर्वाचे लक्ष वेधले.
कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना, पण कठोर निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्यास प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. एका बाजूला जनभावना आहे, पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे. अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर सोसावीच लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कृती गटाच्या तज्ज्ञांचे म्हणणेही आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे. शुक्रवारी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे, असे ठाकरे यांनी नमूद के ले.
रेमडीसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी कडक पाउले उचलावी लागतील. तसेच या औषधाचा अतिरेकही थांबावा लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. टाळेबंदी अचानक लागू करू नये. तत्पूर्वी सामान्य जनतेला दोन-तीन दिवसांचा अवधी द्यावा, अशी सूचना अशोक चव्हाण यांनी केली. करोना प्रतिबंधासाठी राज्य सरकार जो निर्णय घेईल त्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले.
सुवर्णमध्य साधणारा निर्णय घ्यावा : फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला सहकार्याचे आश्वासन दिले. मात्र, चाचण्यांचे अहवाल वेळेत येत नसल्याने मधल्या काळात संबंधित रुग्ण इतरांना संसर्ग होण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे अहवाल वेळेत यावेत, यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी फडणवीस यांनी के ली. रेमडीसिवीर उपलब्धतेसाठी तातडीने प्रयत्न करण्याची आणि ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी काटेकोर नियोजनाची गरजही फडणवीस यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीमुळेच करोनाविरुद्धच्या देशव्यापी लढय़ाला सुरूंग लागला, अशी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलेली टीका आणि राज्य सरकार गंभीर नाही, असे दिल्ली व राज्यात निर्माण झालेले चित्र या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू करून करोनाची साखळी तोडण्यावर राज्य सरकारचा भर आहे. पुढील आठ ते दहा दिवस कठोर निर्बंध लागू करून केंद्राला आपल्याकडे बोट दाखविण्याची संधी द्यायची नाही, अशी रणनीती मुख्यमंत्र्यांनी आखली आहे.
दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट
गेल्या काही दिवसांच्या तुलनेत राज्यात शनिवारी दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट नोंदविण्यात आली. राज्यात गेल्या २४ तासांत ५५,४११ नवे रुग्ण आढळले, तर ३०९ जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या ५ लाख ३६ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी एक लाखापेक्षा अधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्य़ातील आहेत. मुंबई ८९,७०७, ठाणे जिल्हा ७१,०६१, नाशिक ३२,८११, नागपूर ५६,६९८ रुग्ण उपचाराधीन आहेत.