भारतीय क्रिकेट चाहत्यांना सर्वाधिक प्रतीक्षा असलेली घोषणा बीसीसीआयने केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (क्रिकेट) जुलै महिन्यात होणार्या श्रीलंका दौर्यासाठी संघ जाहीर केला आहे. काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे असलेल्या या संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या हाती देण्यात आली आहे. दुसरीकडे जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.
गेल्या काही मोसमांमधून आयपीएलमध्ये (IPL) उत्तम कामगिरी करणारा डावखुरा फलंदाज नितीश राणा याची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर, गेल्या दोन मोसमात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड या युवा फलंदाजांनादेखील संघात स्थान मिळालं आहे.
साकरिया यालादेखील स्थान देण्यात आलं आहे. साकरियाने यंदा राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि अवघ्या 7 सामन्यांनंतर त्याला थेट भारतीय संघाकडून बोलावणं आलं आहे. याशिवाय अष्टपैलू क्रिकेटपटू कृष्णप्पा गौतमदेखील (K Gowtham) संघात दाखल झाला आहे, तर कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि नवदीप सैनी यांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांसारख्या नियमित सदस्यांशिवाय भारतीय संघ श्रीलंका दोऱ्यावर जात आहे. शिखर धवन पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करणार आहेत. याच वर्षी त्याने सय्यद मुश्ताक अली टी -20 करंडक स्पर्धेत दिल्लीचे नेतृत्व केले होतं. तो भारतीय संघात सर्वात वरिष्ठ सदस्य आहे. त्याच्याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, मनीष पांडे आणि युजवेंद्र चहल हे संघातील वरिष्ठ खेळाडूंमध्ये आहेत.
या मालिकेदरम्यान भारतीय संघात पुन्हा एकदा कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलची जोडी एकत्र पाहायला मिळू शकते. कुलदीपला नुकत्याच पार पडलेल्या काही मालिकांनंतर क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या संघातून वगळण्यात आलं होतं. तरीदेखील त्याला पुन्हा एकदा संधी दिली गेली आहे. तथापि, कुलदीपला फिरकीपटू वरुण चक्रवर्तीकडून जोरदार टक्कर मिळू शकते. चक्रवर्तीची याआधी दोनदा संघात निवड झाली होती, परंतु फिटनेसच्या कारणास्तव त्याला संधी गमवावी लागली होती.
भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.