शिवसेना नेते संजय राऊत यांना इडीने पत्रा चाळ गैरव्यवहारप्रकरणी अटक केली आहे. संजय राऊत यांच्या अटकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे काही महिन्यांपूर्वीच शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी संजय राऊत यांची संपत्ती इडीने जप्त केल्याचा मुद्दा पंतप्रधानांपुढे मांडला. त्यावेळी अनिल देशमुख आणि नवाब मलिक या राष्ट्रवादीच्या नेत्यांना इडीने अटक केलेली असतानाही पवार यांनी फक्त संजय राऊत यांच्याबाबतच पंतप्रधानांशी चर्चा का केली? असा प्रश्न तेव्हाही उपस्थित करण्यात आला होता.
राऊतांच्या अटकेवर शरद पवारांच्या या मौनावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असं काही नाही, लोकसभेतही इडीच्या कारवायांसंदर्भात राष्ट्रवादी बोलते. सुप्रियाताई बोलतायत. अनेक विरोधी पक्षांनी हा कायदा राक्षसी असल्याचं म्हणलं आहे. पण हा कायदा युपीएच्या काँग्रेसच्याच काळात बनवला गेला आहे. चिदंबरम साहेबांनीच हा कायदा बनवला आहे, त्यामुळे भाजप तरी काय करणार, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे.
इडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही, पण काही मार्ग निघाला तर आमच्या संजय राऊत यांना शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.