कोरोना स्थिती हाताळण्यात केंद्राला अपयश : सोनिया गांधी

देशातील कोरोना स्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आले असून राज्यांना लशींचा अपुरा पुरवठा करण्यात आला, अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. काँग्रेस शासित राज्यातील कोविड स्थितीचा आढावा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका बैठकीत घेतला त्यात त्यांनी ही टीका केली.

कोविड १९ विषाणूची दुसरी लाट आल्यानंतर देशभरातील काही राज्यात संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. काँग्रेस शासित मुख्यमंत्र्यांच्या आभासी बैठकीत त्यांनी मुख्यमंत्री व मंत्र्यांना चाचण्या, संपर्क शोध व लसीकरण या तीन मुद्दय़ांवर भर देण्यास सांगितले. काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांनी लस पुरवठा, औषध पुरवठा, औषधांची उपलब्धता , व्हेंटिलेटरची उपलब्धता यावर माहिती घेतली, असे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी सरकारने कोविड स्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळली असून देशात लशीची टंचाई निर्माण करून लस निर्यातीला प्राधान्य दिल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. त्या म्हणाल्या,की सार्वजनिक सभा,प्रचार सभा कोविड १९ रुग्ण संख्या वाढल्याने रद्द करायला हव्या होत्या. केंद्र सरकारने ज्या आर्थिक योजना जाहीर केल्या त्याचा राज्यात अपेक्षित परिणाम झाला की नाही याची विचारणा सोनिया गांधी यांनी केली. निवडणूक प्रचारासाठी लोक मोठय़ा प्रमाणात जमत असून धार्मिक कार्यक्रमातही लोकांची गर्दी होत आहे, त्यामुळे रुग्ण संख्या वाढत असल्याचे त्या म्हणाल्या. सोनिया गांधी यांनी सुरुवातीच्या निवेदनात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगून प्रमुख विरोध पक्ष या नात्याने काँग्रेसने जबाबदारी पार पाडावी असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.