अंटार्क्र्टिकावरील बर्फातही आता प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळले असून त्यामुळे बर्फ वितळण्याच्या गतीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम हवामानावर होत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून समोर आले आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास अंटार्क्र्टिक प्रदेशासाठी गंभीर धोका असल्याचे ‘द क्रायोस्फीअर’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झालेल्या या अभ्यासात म्हटले आहे.
भारतात मातीमध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळून आले होते आणि त्यामुळे मातीचा पोत खराब होत असून त्याचा परिणाम शेतपिकांसह इतरही बाबतीत होत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता अंटार्क्र्टिकातील बर्फात प्लास्टिकचे कण आढळले आहे. तांदळाच्या दाण्यापेक्षाही अतिशय सूक्ष्म असलेल्या प्लास्टिकच्या तुकडय़ांमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे बर्फ वितळण्याची गती वाढेल, असेही या अभ्यासात म्हटले आहे.
अतिसूक्ष्म प्लास्टिकचा पर्यावरणावर तसाच मानवी आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. २०१९च्या उत्तरार्धात न्युझीलंडमधील कँटरबरी विद्यापीठातील विद्यार्थी अॅलक्स एव्हस यांनी अंटार्क्र्टिकातून बर्फाचे नमुने गोळा केले. त्यावेळी हवेतील अतिसूक्ष्म प्लास्टिकच्या उपस्थितीची तपासणी करणारा अभ्यास प्रकाशित झाला होता. मात्र, अॅलक्स एव्हस यांनी जेव्हा हे नमुने गोळा केले तेव्हा बर्फातही प्लास्टिक सापडू शकेल, असे संशोधकांना वाटले नव्हते. प्रयोगशाळेत जेव्हा हे सर्व बर्फाचे नमुने तपासण्यात आले, तेव्हा प्रत्येक नमुन्यात प्लास्टिकचे कण आढळून आले, असे या अभ्यासात संशोधकांनी म्हटले आहे.
संशोधकांना वितळलेल्या बर्फाच्या प्रतिलिटरमध्ये प्लास्टिकचे २९ अतिसूक्ष्मकण आढळून आले. बर्फातील हे अतिसूक्ष्म प्लास्टिकचे कण हवेतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून याठिकाणी आले असावे, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जगभरातच प्लास्टिकची समस्या किती गंभीर झाली आहे, याचा अंदाज येतो. भारतातही एक जुलैपासून प्लास्टिकबंदी होत आहे. मात्र, ही बंदी अपयशी ठरली तर भारतातही अंटार्क्र्टिकासारखी परिस्थिती उद्भवण्यास वेळ लागणार नाही.