लठ्ठपणा ही सध्या संपूर्ण जगातील मोठी समस्या बनली आहे. डब्ल्यूएचओच्या मते, संपूर्ण जगात 1.9 अब्ज लोक लठ्ठ आहेत. दरवर्षी 40 लाख लोकांचा लठ्ठपणामुळं अकाली मृत्यू होतो. लठ्ठपणा हे मधुमेह , रक्तदाब , हृदयरोग यासारख्या जीवनशैलीशी संबंधित रोगांचं प्रमुख कारण आहे. यामुळं लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नात असतात. लठ्ठपणा कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे धावणं किंवा दोरीवरच्या उडी मारणं.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी या दोन्ही पद्धती अतिशय सोप्या, किफायतशीर आणि प्रभावी आहेत. मात्र, यापैकी लठ्ठपणा कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे, याविषयी तज्ज्ञ काय म्हणतात, हे पाहू. लाइफस्टाइल आणि फिटनेस तज्ज्ञ मयूर घरत यांनी इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत या प्रश्नाचं उत्तर दिलंय.
घरत म्हणतात, आपणा सर्वांना माहीत आहे की, आपलं प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या व्यायामांची गरज असते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी धावणं किंवा दोरीवरच्या उड्या मारणं या दोन्ही पद्धती चांगल्या, प्रभावी आहेत. दोन्हीही शरीराचा स्टॅमिना वाढवतात. यासह, हृदयाचे स्नायू मजबूत करतात. वजन आणि हाडांची घनताही राखली जाते. हे दोन्ही व्यायाम आयुष्य वाढवतात आणि संपूर्ण फिटनेस राखतात. तथापि, दोघांचेही काही फायदे आणि तोटे आहेत.
धावणं आणि दोरीच्या उड्या मारण्याचे फायदे
दोरीवरच्या उड्या मारण्याचे फायदे
जर तुम्हाला वेगानं कॅलरीज कमी करायच्या असतील तर दोरीवरच्या उड्या मारणं हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. धावण्याच्या एका मिनिटात 10 ते 16 कॅलरीज ऊर्जा बर्न होते. दोरीवरच्या उड्या मारण्याच्या व्यायामात 3 मिनिट ते 10-10 मिनिटांचे सेट केले तर, अर्ध्या तासात 480 कॅलरी ऊर्जा जाळली जाऊ शकते. जलद वजन कमी करण्यासाठी दोरी उडी मारणं अधिक चांगलं आहे.
धावण्याचे फायदे
हलकी किंवा मध्यम धाव शरीरात एंडोर्फिन आणि सेरोटोनिन रसायनं सोडण्यास मदत करते. यामुळं तणाव आणि चिंता कमी होते. धावण्याचा सर्वात मोठा फायदा व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर पडतो. धावणं चिंता, नैराश्य, एकटेपणा, सामाजिक अलगाव (समाजापासून दूर राहण्याची इच्छा) यासारख्या समस्यांपासून मुक्त होऊ शकते. धावल्याने चांगली झोप येण्यासही मदत होते. फुफ्फुसं स्वच्छ करण्यासाठी धावणं खूप फायदेशीर आहे. धावणं फुफ्फुसात जमा झालेला अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड काढून टाकतं. धावणं श्वासोच्छवासाच्या क्रियेत वापरल्या जाणाऱ्या स्नायूंनाही बळकट करतं. विशेषतः ते पोटावरील चरबी खूप लवकर कमी करतं. या व्यतिरिक्त, हे उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाची समस्या कमी करतं.
हलकी आणि वारंवार दोरीच्या उड्या मारल्यामुळं तुमच्या गुडघ्यांवर कमी दबाव येतो. यामुळं घोट्याची स्थिरता सुधारते आणि पिंढऱ्यांचा आकार सुधारतो. दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी पायांच्या तीव्र हालचाली आवश्यक असतात. यामुळं स्टॅमिना वाढतो आणि शरीरात उत्साह संचारतो.