आज दि.२५ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

NSEL घोटाळा प्रताप सरनाईक यांची
११.३५ कोटींची संपत्ती जप्त

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर सक्तवसुली संचालनलायाने (ED) कारवाई केलाी आहे. ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. दरम्यान ईडीच्या कारवाईसंबंधी नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्यासाठी प्रताप सरनाईक विधानभवानात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलही भाष्य केलं. कारवाईविरोधात मी ३० दिवसात कोर्टात अपील कऱणार आहे. कोर्ट जो निर्णय देईल त्याच्या अधीन राहून पुढील कारवाई होईल,” असं प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.

शनिवारी पूर्णवेळ तर रविवारी ऐच्छिक
स्वरूपात शाळा सुरू ठेवण्याची सूचना

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यभरातील शाळांतील पहिली ते नववी, अकरावीचे वर्ग एप्रिलपर्यंत पूर्णवेळ आणि शंभर टक्के उपस्थितीने सुरू ठेवण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यात शनिवारी पूर्णवेळ तर रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वसाधारणपणे मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवण्यास परवानगी दिली जाते. मात्र, या शैक्षणिक वर्षांत मार्चपासून एप्रिल अखेरपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात करण्याऐवजी पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग असलेल्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात.

कोकण वगळता उर्वरित राज्यात
पुढील 4 दिवस उन्हाचा चटका कायम

कोकणात 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा, काजू, केळी बागायतदार शेतकरी चिंतेत आहे. ऐन मोसमात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू धोक्यात आला आहे.
उर्वरित राज्यात पुढील 4 दिवस उन्हाचा चटका कायम राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमधील कमाल तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. हा पारा असाच राहणार असून, 4 दिवस उन्हाचे चटके सोसावे लागणार आहेत.

9 मे आधी रशिया युक्रेन
युद्ध संपण्याची शक्यता

युक्रेनवर रशियाने आक्रमण करून 1 महिना पूर्ण झाला आहे. युद्ध संपणार कधी असा प्रश्न जगाला पडलाय. त्याचं उत्तर पुतीन यांनीच देऊन टाकलंय. पुतीन यांना हे युद्ध 9 मे आधी संपवायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत 9 मे आधी युद्ध संपवा असे आदेशच पुतीन यांनी रशियन कमांडर्सना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. 9 मे हा दिवस रशियात व्हिक्टरी डे म्हणून साजरा केला जातो. नाझी फौजांच्या माघारीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. रशियावर जर्मनीने 1941 साली युद्धबंदीचा करार मोडून हल्ला केला होता.

लोकांनी सतर्क राहिलं
पाहिजे : राजेश टोपे

चीनमध्ये लॉकडाउन लावण्यात आल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सूचक विधान केलं आहे. चीनमध्ये करोना रुग्णसंख्या वाढत असून लॉकडाउन लावण्यात आल्यासंबंधी विचारलं असता राजेश टोपे यांनी सांगितलं की, “आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका घेतली पाहिजे. आपण काळजी घेतली पाहिजे. जगभरात करोनाची चौथी लाट दिसत आहे त्यातून शिकवण घेण्याची गरज आहे. निष्काळजीपणे वागणं चुकीचं आहे आणि त्याची परवानगी नाही. लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे”.

भाजपाचा निवडणुका संपुष्टात
आणण्याचा प्रयत्न : केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर चांगलाच निशाणा साधला आहे. द कश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करण्याच्या मागणीपासून ते निवडणुकांपर्यंत अशा विविध विषयांवरून त्यांनी भाजपावर टीका केली आहे. दिल्लीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना त्यांनी भाजपावर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करत असल्याचा आणि निवडणुका संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

पंजाबमध्ये आता आमदारांना
एकदाच पेन्शन मिळणार

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आमदारांच्या पेन्शनच्या सूत्रात बदल करण्याची घोषणा केली. आता आमदारांना एकदाच पेन्शन मिळणार आहे. आत्तापर्यंत प्रत्येक वेळी आमदार झाल्यावर पेन्शनची रक्कम जोडली जात होती. भगवंत मान म्हणाले की, बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे. तरुण पदवी घेऊन घरी बसले आहेत. ज्यांनी जाब विचारला, त्यांच्यावर लाठीमार केला. अशा परिस्थितीत ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही मोठी पावले उचलत आहोत.

अनिल परबांचं रिसॉर्ट
तुटणारच : किरीट सोमय्या

अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी किरीट सोमय्या उद्या मोर्चा घेऊन जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारला धमकी दिली आहे. “पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारने धमक्या द्यायला सुरुवात केली आहे की किरीट सोमय्यांना दापोलीला येऊन देणार नाही. अनिल परब यांचं बेकायदा रिसॉर्ट पाडण्याचा आदेश आल्यानंतरही उद्धव ठाकरे ते पाडत नाहीत. ते पाडण्यासाठी आम्ही उद्या सकाळी मुलुंडहून निघणार आहोत. आम्ही दापोली समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाणार. उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारमध्ये हिंमत असेल, तर आम्हाला अडवून दाखवावं. अनिल परबांचं रिसॉर्ट तुटणारच”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

आमच्याकडे आत्महत्या शिवाय
दुसरा मार्ग राहणार नाही : दिशाचे पालक

दिशाच्या पालकांनी राष्ट्रपतींना दिलेले पत्र ५ पानांचे असून त्यात त्यांनी नारायण राणे आणि नितेश राणेंवर अनेक आरोप केले आहे. ते आमच्या मुलीची दिशाची प्रतिमा खराब करत आहेत, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे तुम्ही याबाबत अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देऊन आम्हाला योग्य तो न्याय द्या, अन्यथा आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग राहणार नाही, असे ही त्यांनी या पत्राद्वारे सांगितले आहे.

आता देशात Airtelची
5G सेवा सुरु होणार

आता देशात Airtelची 5G सेवा सुरु होत आहे. याबाबत दूरसंचार सेवा देणारी कंपनी एअरटेलने गुरुवारी जाहीर केले की 5G सेवा सुरु करत आहोत. Airtel हाय-स्पीड 5G नेटवर्क लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. एअरटेलने इमर्सिव्ह व्हिडिओ अनुभव आणि भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचा देशातील पहिला 5G पॉवर्ड होलोग्राम प्रदर्शित केला

27 रुपयांचा शेअर 2420 रुपयांवर, गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई

शेअर बाजारात संयम बाळगणे हा गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा मंत्र आहे. कारण शेअर्सची खरेदी-विक्री करून पैसे मिळत नाहीत. चांगले शेअर्स विकत घेतल्यानंतर, जर तुम्ही त्यात जास्त काळ टिकून राहिलात तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसे कमवू शकता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अदानी ट्रान्समिशनचा स्टॉक. गेल्या 7 वर्षातील या स्टॉकची कामगिरी पाहिली तर आपल्याला कळेल.
अदानी ट्रान्समिशन 2021 चा मल्टीबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे. याशिवाय गेल्या 7 वर्षांच्या प्रवासावर नजर टाकल्यास शेअरची किंमत 27.60 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षभरात या स्टॉकमध्ये सुमारे 86,680 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यंदाची आयपीएल कोण जिंकणार? गावसकरांनी केली भविष्यवणी

आयपीएल 2022 च्या मोसमाला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. यंदाच्या मोसमात 8 ऐवजी 10 टीम सहभागी होणार आहेत, त्यामुळे खेळाडूंचा मेगा ऑक्शनही घेण्यात आला. लिलावानंतर आता बरेच खेळाडू नव्या टीमकडून खेळताना दिसणार आहेत. लिलावानंतर अनेक टीमची ताकद वाढली आहे, तर काही टीमच्या कमकुवत बाजूही समोर आल्या आहेत, त्यामुळे यंदा कोणती टीम आयपीएल जिंकणार, याबाबत क्रिकेट पंडित आणि चाहते मत मांडत आहेत. भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांच्या मते यावेळी मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकू शकते.

‘ज्याप्रमाणे ओबामांनी ओसामाला मारलं तसं दाऊदला घरात घुसून मारा, दाखवा मर्दपणा’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी टीका करणाऱ्या भाजपलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी यंदाच्या अधिवेशनात मध्ये-मध्ये येऊन गेलो. कार्यालयातून कामं सुरू होती,. पण येता-जाताना… गंमत वाटेल पण गमतीचा विषय नाहीये. कारण, मी बोललो ना तेच ते आणि तेच ते…. दाऊद आणि जुते, मला वाटलं पूर्वी एक दाऊद शूज होते, तोपण घोटाळ्यात गेला म्हणा. पण ते दाऊद शूजची एजन्सी कुणी घेतली का? कारण दाऊद आणि जुते, दाऊद आणि जुते… बरं हा दाऊद आहे कुठे? एखादा निवडणुकीसाठी विषय किती काळ घेणार तुम्ही? जसा राम मंदिराचा विषय इतके वर्षे तुम्ही घेतला आता यापुढे दाऊदचा विषय घेणार आहात का? आधी रामाच्या नावाने मतं आता दाऊदच्या नावाने मतं मागणार आहात का? हे काय चाललं आहे.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.