प्रत्येक नोकदार व्यक्तीसाठी पीएफ आणि ग्रॅच्युइटी अत्यंत महत्त्वाची असते. कारण ही रक्कम त्याच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याचा आर्थिक आधार असते. सर्वसामान्यपणे खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तीला दरमहा वेतन स्वरूपात मिळणारी रक्कम सेवानिवृत्तीनंतर बंद होते. त्यामुळे पीएफ, ग्रॅच्यइटीच्या रकमेचं नियोजन आवश्यक ठरतं. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात ग्रॅच्युइटीच्या अनुषंगानं अनेक प्रश्न असतात. त्यात सलग किती कालावधीपर्यंत काम केल्यावर ग्रॅच्युइटी मिळते, हा प्रश्न प्रामुख्यानं असतो. ग्रॅच्युइटीचा लाभ मिळण्यासाठी कामाचा कालावधी किती असावा, याचा उल्लेख ग्रॅच्युइटी कायद्यामध्ये स्पष्टपणे केलेला आहे. याशिवाय ग्रॅच्युइटीचा लाभ कोणत्या कर्मचाऱ्याला कसा दिला जातो, या संदर्भातदेखील काही नियम आहेत.
ग्रॅच्युइटी म्हणजे सातत्यपूर्ण सेवेच्या बदल्यात कंपनीनं कर्मचाऱ्याप्रती व्यक्त केलेली एक प्रकारची कृतज्ञता होय. वेतन आणि ग्रॅच्युइटी कायदा देशातले सर्व कारखाने, खाणी, तेल क्षेत्र, बंदरं आणि रेल्वे खातं यांना लागू आहे. 10 पेक्षा जास्त कर्मचारी असणारी दुकानं आणि कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो.
कोणत्याही कंपनीत सलग पाच वर्षं काम करणारे कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात. परंतु काही प्रकरणांमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या सेवेवरही ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम-2A मध्ये सातत्यानं काम करणे याची व्याख्या स्पष्टपणे नमूद आहे. यानुसार, पाच वर्षं काम केलं नाही तरी अनेक कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळू शकतो. भूमिगत खाणींमध्ये काम करणारे कर्मचारी संबंधित कंपनीत सलग 4 वर्षं 190 दिवस कार्यरत असतील, तरी त्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. इतर संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी 4 वर्षं 240 दिवस म्हणजेच 4 वर्षं 8 महिने संबंधित कंपनीत काम करत असतील, तर ते ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात.
कोणत्याही कर्मचाऱ्याला कमाल 20 लाख रुपयांपर्यंत ग्रॅच्युइटीची रक्कम मिळू शकते. ग्रॅच्युइटीची रक्कम निश्चित करण्यासाठी एक सोपी पद्धत वापरली जाते. या पद्धतीच्या मदतीनं ग्रॅच्युइटीची रक्कम समजू शकते. ही पद्धत अशी..
एकूण ग्रॅच्युइटीची रक्कम = (एकूण वेतन) × (15/26) × (कंपनीत किती वर्षं काम केलं तो कालावधी)
उदाहरणार्थ, समजा तुम्ही एका कंपनीत सलग सात वर्षं काम केलं आहे. तुमचं एकूण वेतन (मूळ वेतन आणि महागाई भत्ता मिळून) 35,000 रुपये आहे, तर कॅल्क्युलेशन असं होईल. (35,000)×(15/26)×(7)= 1,41,346 रुपये. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या ग्रॅच्युइटीच्या रकमेचा अंदाज घेऊन आर्थिक नियोजन करू शकता.
खासगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटी हा जिव्हाळ्याचा विषय असतो. सरकारनेदेखील ग्रॅच्युइटीच्या नियमात काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत; मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आतापर्यंतच्या नियमानुसार ग्रॅच्युइटीचा लाभ मिळण्यासाठी कर्मचाऱ्यानं एका कंपनीत सलग पाच वर्षं काम करणं आवश्यक असतं; पण केंद्र सरकार हा कालावधी तीन वर्षांपर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे. हा निर्णय झाला तर त्याचा फायदा खासगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होईल.