दक्षिण भारतात ‘कमळ’ फुलवण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या रणनीतीच्या केंद्रस्थानी ‘ट्रिपल सी’ फॉर्म्युला आहे. यामध्ये सांस्कृतिक राष्ट्रवादाची चिन्हे पुन्हा उदयास आणणं, विविध लोकप्रिय व्यक्तींना पक्षाशी जोडून मतदारांमध्ये विश्वासार्हता प्रस्थापित करणे याचा समावेश आहे. त्याचवेळी, एकेकाळी दक्षिणेतील प्रमुख ताकद असलेल्या काँग्रेसच्या कमकुवतपणामुळे प्रादेशिक पक्षांकडे वळलेला जनाधार आपल्या वळवण्याचा आणि पक्ष मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील चार प्रमुख व्यक्ती पी.टी. उषा, इलैयाराजा, वीरेंद्र हेगडे आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची राज्यसभेवर उमेदवारी हाही याच रणनीतीचा भाग आहे. ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत या राज्यांतील 130 जागा पक्षासाठी किती महत्त्वाच्या आहेत, याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. ते म्हणाले, “दक्षिण भारतात भाजपच्या ‘ट्रिपल सी’ चे राजकीय वैशिष्ट्य यापूर्वी हैदराबादमध्ये सर्वांनी पाहिले होते. तिथे विविध माध्यमांतून सांस्कृतिक राष्ट्रवादाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला. भ्रष्टाचार आणि कुटुंबवादाच्या मुद्द्यांवर प्रादेशिक पक्षांना घेरून आपली विश्वासार्हता प्रस्थापित करण्याची मोहीम सुरू झाली. तसंच आता दक्षिणेतील विविध व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करण्याचा नवीनतम भाग आहे.”
ते म्हणाले, बाकी मोदीजींची लोकप्रियता आणि केंद्र सरकारच्या योजना आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी सुनील देवधर यांनी पीटीआयला सांगितले की, भाजपबद्दल असा समज निर्माण झाला आहे की हा उत्तर भारतीयांचा पक्ष आहे. ते म्हणाले, ‘मात्र प्रत्यक्षात तसं नाही, हे या निर्णयाने दाखवून दिलं आहे.’
दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी या मिळून एकूण 130 लोकसभेच्या जागा आहेत. लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी हे प्रमाण २४ टक्के आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या 130 जागांपैकी केवळ 29 जागा जिंकता आल्या होत्या, तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी येथे 21 जागा जिंकल्या होत्या. २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पूर्वेकडून पश्चिम आणि उत्तरेपर्यंत विजय मिळवलेल्या भाजपचं दक्षिणेत पंख पसरवण्याचं स्वप्न अद्याप अपूर्ण आहे.
दक्षिणेकडील पाच राज्यांपैकी कर्नाटक हे एकमेव राज्य आहे जिथे भाजप अजूनही सत्तेत आहे आणि यापूर्वीही तेथे राज्य केलं आहे. कर्नाटकला दक्षिणेचं प्रवेशद्वार मानणाऱ्या भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. कर्नाटकाव्यतिरिक्त पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात मुख्यमंत्री एन रंगसामी यांच्या नेतृत्वाखाली एनआर काँग्रेस आणि भाजपचे युतीचे सरकार आहे. मात्र, येथील एकमेव लोकसभेची जागा काँग्रेसच्या ताब्यात आहे.