कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट आणि वाढलेली महागाई याचा परिणाम ग्राहकांच्या क्रयशक्तीवर होताना दिसत आहे. परिणामी भारतातील स्मार्टफोनच्या विक्रीत मोठ्याप्रमाणावर घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत स्मार्टफोनची विक्री कमालीची मंदावल्याचे समोर आले आहे.
एप्रिल-जून तिमाहीदरम्यान भारतात 3.24 कोटी स्मार्टफोनची आयात झाली. मात्र वार्षिक तुलनेत त्यात थेट 13 टक्के घसरण झाली आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात कडक लॉकडाऊन असूनही स्मार्टफोनच्या विक्रीत 87 टक्क्यांनी वाढ झाली होती.
दरम्यान, देशात शाओमी या कंपनीच्या स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री झाली आहे. 95 लाख स्मार्टफोन विक्रीसह या कंपनीने 29 टक्के बाजारहिस्सा राखला आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर सॅमसंग आणि रिअलमी कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेत तीन महिन्यात सॅमसंगचे 55 लाख तर रिअलमीचे 49 लाख फोन विकले गेले.
देशात येऊ घातलेल्या 5 जी नेटवर्कसाठी बड्या कंपन्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यामध्ये रिलायन्स जिओ सर्वात आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओकडून मुंबई आणि पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये 5 जी नेटवर्कच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता भारती एअरटेल व टाटा समूहाने इंटेलबरोबर व्यावसायिक सहकार्य करत 5जी मोबाईल तंत्रज्ञानासाठी योजना आखली आहे.
भारती एअरटेलने 5 जी तंत्रज्ञानासाठी इंटेलचे तंत्र व्यासपीठ वापरण्याची योजना बुधवारी जाहीर केली. खुल्या ध्वनिलहरीचे जाळे (ओ-रॅन) त्यासाठी उपयोगात आणले जाणार आहे. भारती एअरटेलने यासाठी इंटेलबरोबर कामही सुरू केले असून काही शहरांमध्ये त्याची चाचणी घेण्यात येत आहे.