मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
काळ मोठा कठीण आला आहे. आपण आत्यंतिक अशा भ्रमयुगामध्ये प्रवेश केला आहे. आता पुढच्या टप्प्यात हळूहळू आपण छद्मबुद्धी विध्वंसकांच्या ताब्यात जातोय. हे विध्वंसक आपल्या पुढील पिढीच्या हातात भिकेचा कटोरा देतील, अशा परखड शब्दात ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कांदबरीकार भारत सासणे यांनी विभाजनवादी नवसंस्कृतीवर कडाडून प्रहार केला.
उदगीर येथे आयोजित साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी सासणे बोलत होते. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन टप्प्यांत सासणे यांनी आपली अध्यक्षीय भूमिका मांडली. ते म्हणाले, लोकांना थाळी वाजवताना बघून लेखक, विचारवंत आणि विचारी माणूस चिंतेत पडला. समाजात विभाजनवादी निर्थक, पण अनर्थकारी, उत्तेजन वाढवणारा खेळ मांडला जात आहे. कला विभाजित झाली आहे. सर्वत्र उपद्रव आणि उन्मादाचा उच्छाद सुरू आहे. विदूषकाच्या हातात अधिकार केंद्रित होत आहेत. सर्वत्र तडे बसवणारी शांतता आहे, कोणीच बोलत नाही, सर्वत्र चतुर मौन पसरले आहे. या मौनात स्वार्थ आहे, तुच्छता आहे, हिशेब आणि व्यवहारदेखील आहे. याच बरोबरीने सामान्य जनतेच्या दु:खाला चिरडणे आहे, भीती, दहशत, प्रलोभने आणि विनाशदेखील आहे, याकडे सासणे यांनी प्रकर्षांने लक्ष वेधले.
या वेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानपीठ विजेते कोकणी कथाकार दामोदर मावजो, यांच्यासह देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, उच्चशिक्षणमंत्री अमित देशमुख, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, पर्यटन व सार्वजनिक बांधकाममंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर उपस्थित होते.
सामान्य माणूस सत्याचा शोध घेत नाही, नैतिकतेचा आग्रह धरत नाही. तो पूर्णत: भ्रमित झाला आहे, कुणीतरी मसिहा येईल आणि आपली सुटका करेल, असे भाबडे स्वप्न तो पाहात बसलाय. काही विचारवंत आता दबल्या आवाजात असे सांगत आहेत की, सध्या विषमता वाढू लागली आहे. गरीब लोक आता दरिद्री होत आहेत, श्रीमंत लोक अतिश्रीमंत होत आहेत. मध्यमवर्ग वेगाने विभाजित होत आहे. तो कनिष्ठ मध्यमवर्गात ढकलला जात आहे. दरी वाढते आहे. कदाचित पुढे जाऊन आर्थिक दुर्बल घटक आर्थिकदृष्टय़ा बरी परिस्थिती असलेल्या समाजवर्गावर आक्रमण सुरू करेल. त्यातून हळूहळू गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होईल.
सध्या काही पुंगीवाले अचानक उगवले आहेत. ते दुष्टबुद्धी, क्षुद्रबुद्धी आणि छद्मबुद्धी आहेत. त्यांना सूड उगवायचा आहे. कधी ते संस्कृतिरक्षक होतात, कधी अभिमानी राष्ट्रभक्त, कधी ज्योतिषी तर कधी ते भाष्यकार होतात. अशा सतत टोप्या बदलतात. एक म्हणतो, मी काशी, दुसरा म्हणतो मथुरा तर तिसरा स्वत:ला अयोध्या सांगतोय. आपल्या तरुणांना असे भ्रमित करून हे पुंगीवाले त्यांना अंधाऱ्या खाईत लोटताहेत, असे सांगताना सासणे यांनी कल्पनेतील स्वगताचा आधार घेतला.
एक देश, एक भाषा, एक पुस्तक, एक संस्कृती असे काहीसे कुणीतरी म्हणत आहे. लेखकाला मात्र यात ‘मेथड इन मॅडनेस’चा वास येतो आहे. पण हा केवळ मॅडनेस नाही तर विचारपूर्वक केलेले चिथावणीखोर विधानदेखील आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन संस्कृती अस्तित्वात नाही ते धर्मही नाहीत, असेलच तर पंथ आहेत असेही कुणीतरी म्हणतो आहे. हे सर्व ऐकून चकित होणारे लोक संस्कृतीची व्याख्या वगैरे शोधू लागले आहेत. लेखक मात्र व्याख्या इत्यादीच्या घोटाळय़ात पडत नाही. त्याला बगलेमध्ये लपवलेली सुरी नेमकी दिसत आहे, अशा सूचक शब्दात सासणे यांनी वर्तमानावर भाष्य केले.