आज दि.६ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी गोड बातमी, मुख्यमंत्र्यांकडून सर्वात मोठा दिलासा

पंढरपुरचे विठ्ठल रुख्मिणी हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतुर झाले आहोत. दोन वर्षांनी पुन्हा आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. वारकरी हरीनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. याच आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे, याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

महाराष्ट्रातल्या झटक्यानंतर दिल्लीत शिवसेना सावध, लोकसभेतील प्रतोद बदलला!

महाराष्ट्रामध्ये झालेल्या राजकीय भुकंपानंतर शिवसेना दिल्लीमध्ये आधीच सावध झाली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी शिवसेनेने प्रतोद बदलला आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांची लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना संसदीय नेते संजय राऊत यांनी केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात भावना गवळी यांना प्रतोद पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांची धडाकेबाज कामगिरी, ठाण्याला वेगळं धरणं, 900 खाट्याचं नवं सिव्हील हॉस्पिटल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरासाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ठाण्यातील 86 वर्षे जूने सिव्हील हॅास्पिटल नवीन बनवण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतच्या सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर ठाण्यात निर्माण होणारं नवं सिव्हील हॉस्पिटल हे 900 खाटांचे होणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ठाण्यासाठी वेगळं धरण उभारण्याची घोषणा केली आहे. ठाणेकरांचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून एकामागेएक चांगल्या कामांचा सपाटा लावला आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरासाठी मोठी तरतूद केली आहे. ठाण्यातील जुन्या सिव्हील हॉस्पिटलला नवसंजीवनी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हे हॉस्पिटल तब्बल 900 खाटांचे इतकं मोठं उभारलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी रखडलेली टेंडर प्रक्रिया पुढच्या 15 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्यासाठी मंजूर झालेला 527 कोटींचा निधी तात्काळ देण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी शिंदे यांनी सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर देखील धरल्याची माहिती समोर आली आहे.

Corona Precaution Dose साठी आता 9 महिने प्रतीक्षेची गरज नाही; मोदी सरकारने केला महत्त्वाचा बदल

18+ सर्वांना कोरोनाचा तिसरा म्हणजे प्रिकॉशन डोस दिला जातो आहे. तुम्हीही हा डोस घ्यायला जाणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रिकॉशन डोस घेण्यापूर्वी आधी ही बातमी वाचा. कारण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या प्रिकॉशन डोसमध्ये काही बदल केले आहेत. प्रिकॉनशन डोसचा कालावधी बदलण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रिकॉशन डोससाठी अंतर आता 9 महिन्यांवरून 6 महिने केलं आहे. म्हणजे कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर आता 9 ऐवजी 6 महिन्यांनी तुम्हाला हा प्रिकॉशन डोस घेता येणार आहे. त्यामुळे तिसऱ्या डोससाठी 9 महिने लांबलचक प्रतीक्षा आता थोडी कमी झाली आहे.

चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरमुळे काली माता चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून काली माता चर्चेत आली आहे. एक चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कालीमातेला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. धर्मग्रंथ सांगतात की ख्रिस्तपूर्व शेकडो वर्षापासून लोक कालीच्या रूपाची पूजा करत आहेत. दुष्ट आणि वाईट शक्तींचा नाश करणारी ती देवी आहे. अशी शक्ती जी कोणत्याही वाईट शक्तीचा पराभव करू शकते. विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस हे त्यांचे परम उपासक होते.

काली किंवा महाकाली यांना अनेक नावांनी संबोधले जाते. ही सुंदर देवी पार्वतीचे गडद आणि भयंकर रूप आहे. जिची उत्पत्ती असुरांच्या नाशासाठी झाली होती. बंगाल, ओडिशा आणि आसाममध्ये तिची विशेष पूजा केली जाते. काली ही शाक्त परंपरेतील दहा महाविद्यांपैकी एक मानली जाते. वैष्णो देवीची उजवी पिंडी महाकालीची आहे.

मंत्रिमंडळात भाजपचा राष्ट्रवादीचाच फॉर्म्युला, फडणवीस नागपूरहून रवाना, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार!

महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आणि शिंदे-फडणवीस सरकार येऊन आता आठवडा होत आला आहे, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आतापर्यंत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाबाबतचा निर्णय होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी कालच नागपूरमध्ये सांगितलं होतं. सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीस काल पहिल्यांदाच नागपूरला आले होते, तेव्हा त्यांचं होम ग्राऊंडवर जंगी स्वागत करण्यात आलं.

नागपूरहून फडणवीस आता मुंबईला निघाले आहेत, आज संध्याकाळी किंवा रात्री फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पन्नाशीच्या मुख्यमंत्र्यांचं दुसरं लग्न

नुकताच पंजाबच्या मान सरकारचा कॅबिनेट विस्तार झाला. यानंतर आता मुख्यमंत्री भगवंत मान आपल्या संसाराची घडीही पुन्हा बसवण्याचा प्रयत्न करत आहे. दोन तरुण मुलांचे वडील असलेले भगवंत मान वयाच्या पन्नाशीत दुसरं लग्न करत आहे. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर 6 वर्षांनी त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. राज्यसभा खासदार म्हणून त्यांचा कार्यकाळ गुरुवारी ( ७ जुलै ) संपत आहे. मुख्तार अब्बास नक्वी हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अल्पसंख्याक मंत्री होते.सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, मुख्तार अब्बास नक्वी हे भाजपातर्फे उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार असण्याची शक्यता आहे. नकवी यांचा राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाळ उद्या संपणार आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.