भारतीय वायुसेना आणि त्याचे धाडसी वैमानिक हे नेहमीच त्यांच्या धाडस आणि हेतूंसाठी ओळखले जातात. प्रत्येक कौशल्यात भारतीय हवाई दलाचे जवान अव्वल आहेत. आता भारतीय हवाई दलाच्या Su-30MKI विमानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हे लढाऊ विमान फ्रेंच हवाई आणि अंतराळ दलाच्या टँकर एअरक्राफ्टमधून हवेत इंधन भरत आहेत.
या व्हिडिओने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. कारण जमिनीपासून अनेक हजार फूट उंचीवर उड्डाण करणे आणि हवेत इंधन भरणे हे लोकांसाठी एक अनोखं आणि रोमांचक दृश्य आहे. यापूर्वी 2020 मध्ये फ्रान्सचे राफेल विमान भारतात पोहोचले तेव्हा त्यांनीही हवेत इंधन भरलं होतं.
सुखोई-30 एमकेआय हे भारतीय हवाई दलाचं घातक लढाऊ विमान आहे. सुखोई-27 ची ही प्रगत आवृत्ती आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हे लढाऊ विमान भारतात बनवतं. हे लढाऊ विमान ताशी 2120 किमी वेगाने उडतं. यात ग्रीसेव्ह-शिपुनोव्ह ऑटोकॅनन बसवलेलं आहे, जे एका मिनिटात 150 फेऱ्या मारतं.
सध्या तैवानवर संतापलेला चीन दक्षिण चीन समुद्राजवळ आपलं वर्चस्व दाखवतोय. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चीन तैवानला घेरून लाईव्ह फायर ड्रिल करत आहे. चीनच्या या कुरापतीला उत्तर देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सागरी भागात मोठा सराव सुरू होणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या सरावात भारतासह 17 देश सहभागी होणार आहेत. ExPitchBlack22 नावाचा हा सराव 19 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या काळात होणार आहे.
ExPitchBlack22 या सरावामध्ये जवळपास 100 लढाऊ विमानं आणि 2,500 लष्करी जवान सहभागी होणार आहेत. याच सरावासाठी भारतीय हवाई दलावे सुखोई 30 MKI आणि हवेत इंधन भरणारे विमान पाठवले आहे.