मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची आज गेल्या आठ तासांपासून ईडी चौकशी सुरु आहे. दुसरीकडे नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार कामाला लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज आपत्ती व्यवस्थापक विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली. तर गोव्यात ताज हॉटेलमध्ये शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं. “E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आमचे ED चे राज्य”, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं.
दीपक केसरकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्याबद्दल संताप व्यक्त केला. तुम्ही राज्यसभेचा राजीनामा देऊन पुन्हा मते घ्या, असं केसरकर म्हणाले. “E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आमचे ED चे राज्य. संजय राऊत यांचे रेकॉर्ड चांगले असेल तर त्यांना क्लीन चिट मिळेल. त्यांना शुभेच्छा”, असं दीपक केरसरकर म्हणाले.
“बाळासाहेबांचं माझ्या कुटुंबातील सदस्य मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न नव्हतं. उद्धव ठाकरे यांनाही मुख्यमंत्री पद नको होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ते दिलं. मात्र आम्ही आज शिवसैनिक मुख्यमंत्री केला”, असंदेखील केसरकर म्हणाले. तसेच “भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना माझा वैयक्तिक विरोध नाही. त्यांच्यी माझी वैचारिक लढाई आहे”, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली.