‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार स्थापन करण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मेहनत घेतली. महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावण्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची राहिली. त्यामुळे भाजप सत्तेत आली तर भाजपचाच मुख्यमंत्री असेल. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात दाखल होतील, असा अंदाज बांधला जात होता. पण त्यांनी परवा पत्रकार परिषदेत मोठा राजकीय बॉम्ब टाकला. नव्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, असं त्यांनी घोषित केलं. त्यानंतर भाजप हायकमांडच्या आग्रहाखातर फडणवीस यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांच्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही म्हणून नाराज होवू नका, असं आवाहन त्यांनी केलं. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून भाजप आमदारांमध्ये नाराजी पसरली का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

देवेंद्र फडणवीस आमदारांना नेमकं काय म्हणाले?

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या सर्व आमदारांची आज मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. “2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा. अडीच वर्षात सर्व रखडलेली काम मार्गी लावू. कोणीही कसलीही काळजी करायचं कारण नाही. हे सरकार आपलं आहे. कुणीही नाराज होऊ नका. सर्वांनी आता जनतेसाठी काम करा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

खुद्द देवेंद्र फडणवीस नाराज?

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदी पुन्हा विराजमान होता आलं नाही म्हणून ते नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांची देहबोली त्याचं उत्तर देत होती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्यांनी कामाचा धडाका लावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला. ते आज मंत्रालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. संबंधित बैठक ही ओबीसी आरक्षणासंदर्भात होती. ओबीसी आरक्षणासाठी तातडीने कारवाई करावी. त्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करावं, अशा प्रकारच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला भाजप नेते प्रवीण दरेकर, संजय कुटे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्रालय गाठलं. मंत्रालयात नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संबंधित माहिती दिली. यावेळी फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना जलयुक्त शिवार योजना पुन्हा कशी सुरु करता येईल याबाबत नियोजन करण्याची सूचना केली. तसेच मेट्रोचं कारशेड आरे कॉलनीतच बनवण्याबाबत कोर्टात बाजू मांडण्यासाठी तयारी करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. या दोन सूचना केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आज अधिकाऱ्यांना ओबीसी आरक्षणाबाबत सूचना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.