पंढरपुरचे विठ्ठल रुख्मिणी हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतुर झाले आहोत. दोन वर्षांनी पुन्हा आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. हरिनामाच्या गजरात वारकरी पंढरीला रवाना झाले आहेत. सत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम शुक्रवारी आज फलटण येथे असणार आहे. तर दुसरीकडे जगद्गगुरू तुकोबाराय यांच्या पालखीसोहळा हा निमगाव केतकी येथे राहणार आहे.
ज्ञानोबारायांची पालखी आज फलटणला मुक्कामी
श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी आज ऐतिहासिक फलटण शहरात मुक्कामी आहे. 21 जूनला विठूनामाच्या गजरात ज्ञानोबारायांची पालखी प्रस्थान करण्यात आले. महाराष्ट्रातील अनेक पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. माऊलींची पालखी आता सातारा जिल्ह्यातून प्रवास करतेय. आज ही पालखी फलटण येथे मुक्कामी आहे. उद्या येथून पुढे पंढरपूरच्या दिशेने वारकरी प्रवास करतील.
तुकोबारायांची पालखी आज निमगाव केतकीत –
ज्ञानोबारायांच्या पालखीसोबत तुकोबारायांचीही पालखी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे. कोरोनामुळे दोन वर्ष पायी वारीस मनाई होती. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या वारीसाठी वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतेय. आज तुकोबारायांची पालखी ही निमगाव केतकीत मुक्कामी आहे. वारकरी हरीनामाच्या गजरात पुन्हा उद्या सकाळी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतील.
यावर्षी 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यासाठी वारकऱ्यांनी पायी वारी सुरू केली असून पंढरपुरकडे मार्गक्रमण केले आहे. आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरमधील लाखो वारकऱ्यांचे विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर येते. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरची वारी करतात.
हा दिवस महाराष्ट्रत अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. यंदा आषाढी एकादशी 10 जुलै रोजी आहे. या दिवशी आळंदी, देहू आणि पैठणसह अनेक ठिकाणांहून संत महंतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात. या दिवशी ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते घरीच विठ्ठलाची पूजा करून उपवास करतात.